शिर्डी- येथील साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन दावा केला होता की, धर्मादाय आयुक्तांच्या चौकशी अहवालात सदर नऊ नाणी माझ्या अध्यक्षतेखाली ट्रस्टकडे आहे. साईबाबांच्या हाताची डीएनए चाचणी करावी, असे वादग्रस्त वक्तव्य पत्रकार परिषदेत त्यांनी केले होते. त्यावर शिर्डी ग्रामस्थांसह अनेक भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचली आहे.
या वक्तव्याच्या निषेधार्थ शिर्डी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गायकवाड यांचा तीव्र शब्दात निषेध केला. साईबाबांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थ आक्रमक झाल्यावर साईबाबांविषयी माझ्याकडून चुकून शब्दप्रयोग झाल्याचे सांगत गायकवाड यांनी जाहीर माफी मागितली आहे. दुसरीकडे शिंदे कुटुंबीयांनी देखील आपल्याकडील नाणी खरी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नऊ नाण्यांचा वाद आता शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.

गायकवाड यांच्या वक्तव्याने भावना दुखावल्याने काल बुधवारी शिर्डी ग्रामस्थांनी द्वारकामाई जवळील हनुमान मंदिर येथे बैठक घेतली. या बैठकीत अरुण गायकवाड शिर्डीत अथवा परिसरात दिसताच त्याच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी त्याचे दुकान आणि घराबाहेर जाऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त करत निषेध नोंदविला.
यावेळी नऊ नाण्यांच्या आडून गैरकृत्य करणाऱ्यांना शिर्डीत थारा दिला जाणार नाही, शिर्डीत राहू दिले जाणार नाही, शिर्डीची प्रतिष्ठा अशा लोकांनी मलीन करण्याचे काम चालवले आहे. त्यामुळे त्यांना शिर्डीत राहण्याचा अधिकार उरत नाही, असे म्हणत सर्वांनीच त्यांच्यावर रोष व्यक्त केला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी.
तसेच वातावरण शांत राहावे म्हणून पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने व पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, एका शिंदे परिवाराने आपल्याकडील असलेले साईबाबांनी दिलेले नऊ नाणे साई दरबारी अर्थात साईबाबा संस्थानकडे जमा करण्याचा निर्णय या बैठकीप्रसंगी बोलून दाखवला असल्याचे बोलले जात आहे. तर या सभेत अनेकांनी अरुण गायकवाड यांचा निषेध व्यक्त करताना त्यांच्याकडील नाणी देखील साईबाबा संस्थानने जमा करून घ्यावी, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
यावेळी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष अभयराजे शेळके, शिवसेनेचे संजय आप्पा शिंदे, माजी उपनगराध्यक्ष निलेशदादा कोते, संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, ताराचंद कोते, छोटेबापू उर्फ दत्तात्रय कोते, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, नितीन उत्तमराव कोते, प्रमोद गोंदकर, विकास गोंदकर, प्रतीक शेळके, प्रकाश गोंदकर आदी ग्रामस्थांनी आपले मत व्यक्त केले. याप्रसंगी शिर्डी शहरातील विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नऊ नाणे हे शिंदे कुटुंबाकडे आहे. कालच्या पत्रकार परिषदेत गायकवाड यांनी उपस्थित केलेला प्रश्न पूर्णपणे निराधार आहे. शिर्डीतील जुने जाणत्या लोकांच्या म्हणण्यानुसार शिंदे कुटुंबाकडे खरे नाणे आहे. याबाबत आम्ही शिर्डी ग्रामस्थ साईबाबा संस्थान आणि धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सखोल चौकशीची मागणी करणार आहे. या नाण्यांवर अरुण गायकवाड यांच्या कुटुंबाकडून दिशाभूल केली जात आहे. या गोष्टींला आळा बसण्यासाठी आम्ही आज सर्व ग्रामस्थ एकवटलो आहोत.
– कैलासबापू कोते प्रथम नगराध्यक्ष, शिर्डी
१९१८ साली विजयादशमीच्या दिवशी श्री साईबाबांनी महासमाधी घेतली. त्यांच्या अखेरच्या काळात श्री साईबाबांना नित्य नेमाने भोजन आणि सेवा देणाऱ्या साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना श्री साईबाबांनी निर्वाण समयी चांदीची ९ नाणी भेट दिली होती. ही नाणी श्री साईबाबांच्या भक्तीची, विश्वासाची आणि एक ऐतिहासिक, भावनिक ठेवा मानला जात आहे. मात्र, आता याच नाण्यांवरून वाद निर्माण झाला आहे.
या संपूर्ण वादावर तोडगा काढण्यासाठी आणि खरी नाणी नेमकी कुणाकडे आहेत हे स्पष्ट होण्यासाठी, तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी सर्व नाण्यांची पुरातत्व विभागाकडून सत्यता तपासण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सत्य समोर येईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. यापूर्वी श्री साईबाबा संस्थानने या वादात दोन्हीकडील व्यक्तींना नोटीस बजावली होती. ज्यामुळे या वादाला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले होते. सध्या शिर्डीत या नऊ नाण्यांवरून सुरू असलेल्या वादामुळे देश-विदेशातील करोडो साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. श्री साईबाबांनी दिलेली ही ऐतिहासिक नाणी आणि त्यांची सत्यता जगासमोर येणे अत्यंत गरजेचे आहे.