अहिल्यानगर : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घारगाव आणि कोळगाव या परिसरात अवैध दारूविक्री करणाऱ्या हॉटेलवर धडक कारवाई केली. या कारवाईत ७१ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून प्रकरणी कुलदीप लगड, किरण मोळक, भाऊसाहेब साळुंके या तिघांना अटक केली आहे.
विशेष पथकाच्या या कारवाईने बेलवंडी पोलिस ठाण्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाला अवैध व्यवसाय दिसत असून बेलवंडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून या अवैध व्यावसायिकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. असा प्रश्न निर्माण होत आहे.
यापूर्वीच प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या प्रशिक्षण कालावधीत त्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर कारवाया करत त्यांचे कंबरडे मोडले होते. दरम्यान त्यांचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर देखील पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या अविरत सुरू असलेल्या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर आणि पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना मिळालेल्या माहिती नुसार नगर दौंड महामार्गावरील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोळगाव घारगाव परिसरातील हॉटेल वर अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या नुसार पथकाने बुधवार संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोळगाव येथील जगदंबा हॉटेलवर छापा मारत ९ हजार २५ रुपयांची अवैध दारू जप्त केली. तर घारगाव परिसरातील राजसिद्धी हॉटेलमधून ४ हजार ४१० रुपयांची दारू जप्त केली. तसेच घारगाव बस स्थानकावरील महाराजा चायनीज येथून ५८ हजार रुपये अशी एकूण ७१ हजार ४३५ रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केली.