घोडेगाव- येथील शाळेच्या आवारात उर्दू माध्यम वर्गाच्या व्हरांड्यात शाळा संपल्यावर जुगाऱ्यांचा वर्ग भरत असल्याचे नुकतेच आढळुन आले आहे.सोमवारी सकाळी वर्ग सुरू होताना उर्दू माध्यम वर्गाच्या व्हरांड्यात पत्त्यांचे दोन कॅट, गुटख्याच्या पुड्या, एनर्जी ड्रिंकच्या बाटल्या, सिगारेटची मोकळी पाकिटे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टीकचे ग्लास आढळून आले.
त्यामुळे येथे मद्यपान होत असल्याची शक्यता आहे. जुगाऱ्यांनी गुटखा, मावा खाऊन फरशीवर घाण केली आहे. तर भिंतीही थुंकीने रंगवलेल्या आहे.गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार येथे होत आहे. काही समाजकंटक मंडळीपासून नेहमीच हा त्रास असल्याचे येथील वर्गशिक्षिकेने सांगितले. प्राथमिक शाळेत सुरक्षेसाठी सी. सी.टि.व्ही. कॅमेरे असते तर सदर प्रकार घडला नसता.

याबाबत मराठी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पटारे यांनी सांगितले की, आपण आठ महिन्यांपासून येथे आलो आहे. सी.सी.टि.व्ही. कॅमेरे बसविण्यासाठी दिले आहे. चार पाच दिवसांत बसवले जातील. भिंतीवरही तार कंपाऊंड करु, असे त्यांनी सांगितले. येथील उर्दू शाळा तालुक्यातील एक नंबर आहे.
देसरडा यांच्या सरपंच कार्यकाळात तिचे नूतनीकरण करुन शाळेच्या भिंती सचित्र करण्यासाठी अंदाजे दहा लाख रुपये खर्च करण्यात आले होते. येथे आता जुगाऱ्याचे वर्ग बघून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
शालेय आवारात समाजविघातक प्रवृत्ती बेकायदा कृत्य करत असतील तर पोलिसांना निवेदन देऊन बंदोबस्त करण्यात येईल. सार्वजनीक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सर्वानी लक्ष देण्याची गरज आहे.
– राजेंद्र देसरडा, सरपंच
शाळा हे ज्ञान मंदिर आहे. येथे आपलीच मुलं शिक्षण घेतात. आम्ही आता येथे लक्ष ठेवणार आहोत, कोणी सापडल्यास गय होणार नाही.
-अलीभाई शेख, सामाजिक कार्यकर्ता