करंजी- पाथर्डी तालुक्यातील धारवाडी बसस्थानकाजवळ महावितरणचा विजेचा पोल उभा असून, त्या पोलसाठी तान म्हणून असलेल्या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने नारायण सोनवणे यांच्या म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
या म्हशीच्या मृत्यूमुळे सोनवणे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गाय-बैल म्हैस हा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा आर्थिक आधार म्हणून ओळखले जातात. मात्र, अशा काही घटना घडल्या तर शेतकऱ्यांचे अचानक लाखो रुपयांचे नुकसान होते.

एका गरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या म्हशीचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने धारवाडी गावामधून हळहळ व्यक्त केली जात आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पोलसाठी दिलेल्या ताणामध्ये विद्युत प्रवाह उतरत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी सरपंच भीमराज सोनवणे यांना माहिती दिली. लगेच सरपंच सोनवणे यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यासंदर्भात माहितीही दिली.
परंतु वीज कर्मचाऱ्यांनी याकडे डोळेझाक केल्याने पुढची घटना घडली. त्यामुळे शेतकरी नारायण सोनवणे यांना तत्काळ महावितरणकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी सरपंच सोनवणे यांनी केली आहे.