महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नगरसेवकाने स्वखर्चातून सुरू केली कचरा संकलन मोहीम

Published on -

अहिल्यानगर- शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून महानगरपालिकेच्या घंटागाड्या न फिरल्याने रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचून अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिकांना होत असलेल्या या गैरसोयीची दखल घेऊन माजी नगरसेवक निखिल वारे यांनी स्वतःच्या खर्चाने कचरा संकलन मोहिमेला सुरुवात केली आहे.

शिलाविहार भागात ज्येष्ठ नागरिक सुधाकर देशपांडे यांच्या हस्ते या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. वारे यांच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले असून, या कामामुळे स्वच्छतेकडे होणाऱ्या वाटचालीचे कौतुक केले आहे. या वेळी मच्छिद्र तूवर, दिनकरराव थोरात, प्रकाश गुंफेकर, माऊली गायकवाड, संदीप भुसारी, सचिन देवरे, मयूर कटारिया, शैलेश सोनग्रा, बापू गायकवाड, सचिन सानप, सचिन गाडे आदींसह नागरिक उपस्थित होते.

यावेळी निखिल वारे म्हणाले, सर्वसामान्य नागरिक महानगरपालिकेला कर भरतात, त्यामुळे त्यांना मानपानाने सोयी-सुविधा मिळायलाच हव्यात. मात्र, गेली दोन वर्षे मनपात नगरसेवक नसल्याने महासभा होत नाहीत, प्रशासन समस्यांकडे दुर्लक्ष करते आणि नागरिकांच्या अडचणी वाढतात. आमचा नागरिकांशी रोजचा संपर्क असल्याने त्यांचे प्रश्न आम्हाला माहिती आहेत.

प्रभागातील कचरा व अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असल्याने, अखेर स्वखर्चाने का होईना हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला. हे माझे कर्तव्य आहे. नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याने लवकरच हा प्रश्न पूर्णपणे सुटेल, असा मला विश्वास आहे. निखिल वारे यांच्या या पुढाकारामुळे प्रभागातील घनकचऱ्याचे साम्राज्य हळूहळू संपुष्टात येऊन रस्त्यांवर पुन्हा स्वच्छता निर्माण होणार असल्याची नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!