अहिल्यानगर : तंत्रज्ञानाचा प्रभावी व सकारात्मक वापर केल्यास आपल्याला त्याचा फायदा होतो.याचा प्रत्यय नुकताच कर्जत तालुक्यातील नागरिकांना आला आहे.
कर्जत तालुक्यातील शिंपोरा येथील शेतकरी व कीर्तनकार शरद महाराज काळे यांच्या दावणीला बांधलेल्या दोन म्हशी चोरीस गेल्या. ही खबर शिंपोरा येथील सरपंच अमोल चव्हाण यांना समजली, त्यांनी तात्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन नंबरवरून या घटनेची माहिती दिली.
त्यानंतर ग्रामस्थ जागे झाले. म्हशींचा शोध घेऊ लागले. ग्रामस्थांची जागरुकता पाहून चोरांनी म्हशी सोडून पळ काढला, यामुळे म्हशी सापडल्या. याबाबत अधिक माहिती अशी – कर्जत तालुक्यातील शिंपोरा येथील शेतकरी शरद काळे यांच्या वस्तीवर २८ जुलै रोजी चोरी झाली.

रात्री साडेदहा वाजता त्यांच्या जनावरांच्या गोठ्यातील दोन म्हशींची चोरी झाली, हे लक्षात आल्यावर शेतकरी शरद काळे यांनी गावचे सरपंच अमोल चव्हाण यांना या घटनेची माहिती दिली, त्यानंतर सरपंच अमोल चव्हाण यांनी रात्री अकरा वाजता सुरक्षा यंत्रणेवर ही माहिती सर्वांना कळवली, गाव जागे झाले, मग ग्रामस्थांनी शोधाशोध सुरू केली.
संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येतात चोर दोन्ही म्हशी सोडून पळून गेले व पुढील एक तासात घरापासून एक किलोमीटर अंतरावर ओढ्याच्या बाजूला शिंपोरे ग्रामस्थांना चोरीला गेलेल्या दोन्ही म्हशी सापडल्या आणि सदर शेतकऱ्याचे होणारे मोठे नुकसान ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तत्काळ व प्रभावी वापरामुळे टळले.
अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचा संयुक्त उपक्रम असणाऱ्या ग्रामसुरक्षा यंत्रणेत जिल्ह्यातील ११९७ गावे सहभागी आहेत.
जिल्ह्यातील १२ लाख ६७ हजार नागरिक यंत्रणेत सहभागी आहेत. आजवर जिल्ह्यात २६०७४ वेळा या यंत्रणेचा यशस्वी वापर करण्यात आला आहे. संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्रामसुरक्षा यंत्रणेवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जात असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होत आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा यशस्वी वापर करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद कार्यालय व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.