राहुरी शहर- राहुरी तालुक्यातील एका २३ वर्षीय विवाहित तरुणीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर घटना ३० जून २०२५ रोजी रात्री घडली. तसेच या प्रकरणात आरोपीने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की पीडित तरुणी राहुरी तालुक्यात पती आणि मुलीसह वास्तव्यास आहे. एक महिन्यापूर्वी पप्पु उर्फ अतुल गायकवाड याने पीडितेला फोन करून “मला तुला भेटायचं आहे” असं सांगितलं. यावर तिने त्याला स्पष्टपणे सांगितलं की, “मी तुला भाऊ मानते, आमचं नातं बहिण-भावाचं आहे, कृपया पुन्हा फोन करू नको.

३० जून रोजी रात्री ११ वाजता पीडिता घरात असताना आरोपी पप्पु ऊर्फ अतुल हा घरात शिरला. “तू पोलीस स्टेशनला जाऊन माझ्याविरुद्ध तक्रार करून माझी बदनामी का केली?” असे म्हणत त्याने शिवीगाळ केली. पीडिता त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीच्या आईने पीडितेचे दोन्ही हात पकडले. त्या दरम्यान आरोपीने पीडितेचे कपडे फाडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आरडाओरड केल्यावर तिला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली.
या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पीडित विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात नोंदवली. त्यावरून आरोपी पप्पु उर्फ अतुल बबन गायकवाड व एका महिलेविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३९/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ७६, ७४, ३३३, ३५२, ३ (५) तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (आर), ३ (१) (एस), ३ (२) (व्हिए) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे करत आहेत.