मिरजगाव- कर्जत तालुक्यातील मिरजगाव हे अहिल्यानगर – करमाळा राष्ट्रीय महामार्गावरील एक मोठे गाव असून, याठिकाणी असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात दररोज शंभराहून अधिक एसटी बसेस ये, जा करत असतात. येथील बसस्थानकात कोट्यवधी रुपये खर्च करूनही प्रवाशांसाठी बांधण्यात आलेले सुलभस्वच्छतागृह येथील उपहारगृहाच्या अगदी जवळ अडचणीत व चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांमधून सांगण्यात येत आहे.
हे स्वच्छतागृह धुळखात पडले असून, बसस्थानकातील स्वच्छतागृहाची असून अडचण, नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. मिरजगाव येथे नवीन बसस्थानक बांधण्यात आले आहे. परंतु, प्रवाशांसाठी बांधण्यात आलेले स्वच्छतागृह अडचणीत व कुलूपबंद असल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे.

परिणामी, पुरुष प्रवासी भिंतीच्या आडोशाचा आधार घेत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. महिला प्रवाशांची कुचंबणा होत आहे. एसटी आगाराचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येणाऱ्या महिला व पुरुष प्रवाशांना शौचालय व लघुशंकाकरिता मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
बऱ्याचदा महिला प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, विद्यार्थी यांची मोठी कुचंबणा होत आहे. येथील बसस्थानकात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशी व स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.
स्वच्छतागृहाचा प्रश्न तत्काळ मार्गी न लागल्यास मिरजगाव बसस्थानकासमोर उपोषणाचा इशारा स्थानिक नागरिकांकडून देण्यात आला आहे. येथील बसस्थानकाच्या पुनर्बाधणी तसेच कॉंक्रिटीकरण आणि सुलभ शौचालयाकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. याकरिता दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले; परंतु कोट्यवधी रुपये खर्च करूनही बांधण्यात आलेले सुलभ
शौचालय याठिकाणी एक शोभेची वस्तू बनली आहे. मिरजगाव बसस्थानकाच्या मालकीची तब्बल तीन एकर जागा असूनदेखील प्रवाशी वर्गाची याठिकाणी गैरसोय होत असल्याचे दिसत आहे. एकीकडे शासन बसस्थानक स्वच्छ सुंदर व हायटेक करण्याकरिता विविध अभियान राबवत असताना मिरजगाव बसस्थानकात मात्र उलटीच परिस्थीती दिसत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही प्रवाशांना लघुशंकेसाठी उघड्या परिसरात जावे लागते आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसवरील मोनोवर ‘प्रवाशांच्या सेवेत’ हे गोंडस ब्रीदवाक्य लिहून ठेवले आहे; पण खरोखरच परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी आहे काय, असा सवाल संतप्त प्रवासी उपस्थित करीत आहेत. बसस्थानकात रात्रीच्यावेळी अंधाराचे साम्राज्य असते.
रात्रीच्या वेळी येणाऱ्या व जाणाऱ्या बसेस मिरजगाव बसस्थानकात न येता राष्ट्रीय महामार्गावरून बायपासने जातात. नगर किंवा सोलापूर आदी ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांना बसचे चालक व वाहक बसस्थानकात न सोडता बायपासला उतरवतात, त्यामुळे अनेकदा प्रवाशांची वादविवाद घडत आहेत. या प्रवाशांच्या गैरसोयीचा प्रश्न परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी.
मिरजगाव बसस्थानकात महिला प्रवाशांची स्वच्छता गृहाअभावी मोठी कुचंबणा होत आहे. याबाबत आपण राज्य परिवहनमंत्र्यांना लेखी निवेदन पाठविले आहे. सदर प्रश्न तत्काळ मार्गी न लागल्यास लवकरच बसस्थानकासमोर स्थानिक ग्रामस्थांसह उपोषणाला बसणार आहोत.
अच्युत नाना वीरपाटील, श्रमदूत, स्थानिक ग्रामस्थ.