अहिल्यानगर : वकिलाने आपल्याला नोटीस पाठवली, २० लाख रुपये मागितल्याचा आरोप करीत साक्षीदार कठड्याशेजारी उभा असलेल्या एकाने युक्तिवाद चालू असताना वकिलावर जीवघेणा हल्ला केला.
येथील न्यायालय परिसरात काल बुधवारी ही घटना घडल्याने वकिलांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे येथील न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. याबाबत ॲड. दिलीप दत्तात्रय औताडे (वय ४४) यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, न्यायालयासमोर कौटुंबिक प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

अमरावती येथील आरोपीविरोधात उलट तपासणी सुरू होती. त्यावेळी तो मध्ये बोलत होता. यावेळी तुम्ही तुमची केस चालवणार का? तुम्हाला याची माहिती आहे का? असे न्यायाधिशांनी विचारले. त्यावर आपण वकिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रश्न लिहून आणले आहेत, असे सांगितले.
त्यावर सदर वकिलाने आपल्याला नोटीस पाठवली आणि २० लाख रुपये मागितले असल्याचे सांगत वकिलाविरोधात अरेरावीची भाषा सुरू केली. त्यावर वकिलासह न्यायाधिशांनी त्याला व्यवस्थित बोलण्याचे सांगितले. त्यावर काही कळायच्या आतच त्याने वकील औताडे यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
सर्व प्रसंग पाहून उपस्थित ॲड. औताडे यांच्या मदतीला धावले आणि ॲड. औताडे यांची सुटका केली. तत्काळ प्रसंगावधान साधत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यामध्ये ॲड. औताडे यांना डोळ्याला, डोक्याला मार लागला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.