राहुरी- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची राहुरी शहरात विटंबना झाल्यापासून चार महिने उलटले तरीही आरोपी अद्याप मोकाट फिरत असून, पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
या प्रकरणाचा तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे द्यावा, अशी मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करत २६ जुलै रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी काल शहरातील विविध गणेश उत्सव मंडळांनी प्रशासनाला निवेदन दिले.

राष्ट्रीय श्रीराम संघ, जय अंबिका तरुण मित्र मंडळ, श्री बुवासिद्ध बाबा तरुण मंडळ, मळगंगा तरुण मंडळ तसेच सकल हिंदू समाज यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांनी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २६ मार्च २०२५ रोजी घडलेल्या या घटनेला चार महिने पूर्ण होऊनही आरोपीचा तपास लागलेला नाही, ही खेदजनक बाब आहे. या घटनेनंतर सकल हिंदू समाजाने दोन दिवस शहर बंद ठेवले होते.
त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी तीन दिवस उपोषण केले होते. त्या वेळी पोलिसांनी लवकरच आरोपी सापडेल, असे आश्वासन दिले होते. मात्र, चार महिने उलटूनही काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी पुन्हा एकदा २६ जुलैपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनासाठी प्राजक्त तनपुरे यांना सकल हिंदू समाजाने जाहीर पाठिंबा दिला असून, त्यांच्या पुढाकारात समाज सहभागी होणार आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर चार महिन्यांनंतरही आरोपी सापडत नसेल, तर सकल हिंदू समाज शांत बसणार नाही.