अहिल्यानगर : येथील व्यापारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदा घेवून तो परराज्यातील व्यापाऱ्यांना विक्री करतात. मात्र या कांदा खरेदी व विक्रीच्या व्यवहारात पाच परप्रांतीय व्यापाऱ्यांनी नगरच्या कांदा व्यापाऱ्यास साडे सव्वीस लाखांना गंडवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात २४ जुलै रोजी पाच जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कांदा व्यापारी राहुल रामदास आंधळे (वय ३१, रा. पारिजात कॉर्नर, गुलमोहर रोड, सावेडी, अ.नगर) यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली.फिर्यादी यांचा केडगाव परिसरातील नेप्ती मार्केट येथे कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. फिर्यादी यांच्याकडून ४ जानेवारी २०२० ते ९ मार्च २०२० दरम्यान मोहम्मद नदिम (पूर्ण नाव माहित नाही. रा.सब्जीमंडी, पिलीभित, उत्तर प्रदेश) अरिफ रजा, मोहम्मद युनूस अँड कंपनी, मोहम्मद हसीन, छोटे मिया अँड कंपनी (रा. माहित नाही) यांनी ट्रान्सपोर्टद्वारे वेळोवेळी कांदा खरेदी केला.

या कांद्याची रक्कम त्यांनी फिर्यादी यास दिली नाही. वेळोवेळी पैशाची मागणी केली असता त्यांनी फिर्यादी यांना उडवाउडवीचे उत् तरे दिली व पैसे देण्यासही नकार दिला.
याप्रकरणी फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर फिर्यादी यांनी पैसे मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र डावखर हे करीत आहेत.