पारनेर तालुक्यात दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश, स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा

Published on -

कान्हुरपठार- पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची एक मादी व तिचे एक पिलू अडकल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

याबाबतची माहिती अशी की, पिंपळगाव तुर्क येथील कन्हेर ओहळ परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात होते. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या, कुत्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केलेला होता. त्या अनुषंगाने पिंपळगाव तुर्कच्या सरपंच सौ. सुलोचनाताई शिंदे, उपसरपंच इसाकभाई शेख यांन्च्यामार्फत वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली होती.

पिंपळगाव रोठा (कारेगाव) शिवारात शेतकरी किसन चांगू वाळुंज यांच्या शेतात सोमवारी पिंजरा लावण्यात आला. पिंजरा आणण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य नवनाथ वाळुंज, उस्मान इनामदार, स्वप्निल वाळुंज, रोहन वाळुंज, गणेश वाळुंज, निलेश बडे, वनरक्षक कान्हूर पठार तसेच किशोर गुंजाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बुधवार (दि.२३) रोजी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास रात्री भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या पिंजऱ्याच्या परिसरात फिरत असताना बिबट्याची मादी अंदाजे (वय ३-४ वर्षे) व तिचे एक पिलू (वय १ वर्ष) हे दोन्हीही पिंजऱ्यात अडकले. स्वप्निल वाळुंज व आकाश वाळुंज त्या परिसरामध्ये गेले असता, त्यांना बिबट्याचे एक पिल्लू पिंजऱ्याभोवती फिरत असताना दिसले तर मादी व एक पिल्लू पिंजऱ्यामध्ये अडकल्याचे पाहिले. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सावकार शिंदे यांनी वनरक्षक निलेश बडे यांना माहिती दिली.

पारनेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल रहाणे, वनरक्षक निलेश बडे, वनरक्षक भीमराव दवणे, वाहन चालक दिगंबर विरोळे व किशोर गुंजाळ यांनी काल सकाळी पिंजऱ्यातील बिबट्यांना त्यांच्या गाडीतील पिंजऱ्यामध्ये शिफ्ट करून पुढील कार्यवाहीसाठी पारनेरला रवाना झाले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अक्षय वाळुंज, सेवा संस्थेचे माजी चेअरमन विजय गवळी, संचालक संजय वाळुंज, माजी उपसरपंच धोंडीबा वाळुंज यांच्यासह अनेक तरुण मित्र व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या परिसरात अजूनही बिबटे असून, त्यांना पकडण्यासाठी पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावण्यात आलेला आहे.

या संपूर्ण परिसरात आणखी काही बिबटे असून, त्यांना पकडण्यासाठी वनविभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावला आहे. वनविभाग व सरपंच सौ. सुलोचनाताई शिंदे यांनी बिबट्‌यापासून संरक्षण करण्यासाठी सतर्क राहण्यासंदर्भात व्हाट्सअपच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. – सरपंच, सुलोचनाताई शिंदे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!