अहिल्यानगरमध्ये लाईट गेल्यामुळे माजी नगरसेवकाने महावितरणाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना केली मारहाण, १५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Published on -

अहिल्यानगर- शहरातील केडगाव येथे मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असताना केडगाव येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात माजी नगरसेवक अमोल येवले यांच्यासह दहा ते बारा जणांनी येऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या कारणावरून धुडगूस घातला.

कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून खुर्चा, रजिस्टर फेकून दिले. अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याच्या डोक्यात टणक वस्तूने मारले. याप्रकरणी अमोल येवले याच्यासह दहा ते १५ जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत महावितरणचे शहर विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील रघुनाथ राहिंज (वय ४५) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, ८ जुलै रोजी दुपारी ४.२० च्या सुमारास रभाजी नगर, लिंकरोड, भूषणनगर, शाहुनगर, बी मराठा नगर, कांदा मार्केट रोड, कल्याण रोड येथे केडगाव उपकेंद्रातून जाणारी वीज वाहिनी नादुरुस्त झाल्याने तिच्या दुरुस्तीसाठी केडगाव येथील १३२ के. व्ही. उपकेंद्र येथून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.

त्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या केडगाव उपकेंद्र येथील कार्यालयात गेलो असता तेथे राहुल सीताराम शिलावंत, सुग्रीव नामदेव मुंढे, गोरक्षनाथ रोहकले हे कर्मचारी होते. साधारण साडेनऊच्या सुमारास माजी नगरसेवक अमोल येवले यांच्यासह १२ ते १५ लोक आले. माजी नगरसेवक अमोल येवले म्हणाले की, तुम्ही काय काम करता, नुसते मोबाईल खेळता, किती वेळ झाला लाईट नाही.

मी त्यांना म्हणालो की, केडगाव भागामध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते व ते काम करीत असताना लाईट बंद करावी लागते, असे म्हणालो असता अमोल येवले व त्यांच्या इतर सहकारी यांना राग आल्याने ते मला शिवीगाळ करू लागले. त्यांना समजावून सांगत असताना अमोल येवले याच्यासह १२ ते १५ अनोळखी व्यक्तींनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!