राहुरी- शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त असून, त्या अनुषंगाने माजी मंत्री प्राजक्त तनपूरे यांनी १४ जुलै रोजी अचानक रुग्णालयात भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि गंभीर सुविधांच्या अभावावर संताप व्यक्त केला.
राहुरी ग्रामीण रुग्णालयातील परिस्थिती अत्यंत दयनीय असून, रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळत नाहीत. विशेष म्हणजे, मृतदेहासंबंधीही संवेदनाहीनता दिसून येते. दोन दिवसांपूर्वी शहरातील हॉटेल व्यावसायिक राजेश नगरकर यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शवविच्छेदनासाठी तब्बल तीन तास विलंब झाला. यामुळे नगरकर कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

ही घटना माजी मंत्री प्राजक्त – तनपूरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काल राहुरी ग्रामीण रुग्णालयात अचानक भेट देऊन रुग्णांची होणारी हेळसांड आणि मृतदेहासोबत होणारी विटंबना याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्यासमोर वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही आपल्या अडचणी स्पष्टपणे मांडल्या.
तनपूरे यांनी तात्काळ वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून आवश्यक त्या सूचना दिल्या. त्यांनी शवविच्छेदन गृह परिसराची तातडीने स्वच्छता करण्याचा आदेश नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिला. यावेळी राजेंद्र बोरकर, पांडूभाऊ उदावंत, अर्जुन बुऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.