सोनई- शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी व माजी विश्वस्त नितीन सूर्यभान शेटे (वय ४२) यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी, २८ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली.
नितीन शेटे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानाचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता. सोमवारी सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर शनिशिंगणापूरमध्ये एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच शिंगणापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथे पाठविला.

गेल्या काही दिवसांपासून शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचाराच्या चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. याच चौकशीदरम्यान अनेक गंभीर आरोप समोर आले होते. विश्वस्त मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे देवस्थानाचे बनावट अॅप तयार करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही आरोप करण्यात आला होता.
या सर्व प्रकारांनंतर शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर येथे मंदिर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून पुढे आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील माहिती अधिवेशनात सभागृहात दिली होती. या मुद्द्यावर आमदार विठ्ठल लंघे यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे, असा परिवार आहे. ते प्रगतशील शेतकरी सुर्यभान शेटे यांचे मुलगा होत.
पोलिसांच्या चौकशीत कारण स्पष्ट होईल
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नितीन शेटे यांच्या आत्महत्येबाबत नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्याचा अहवाल काय सांगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणावर अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे पुढील चौकशीत काय उलगडा होतो, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान ऑनलाईन दर्शन अॅप घोटाळ्यात सायबर पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांची चौकशी केली असून, त्यात दोन ते तीन विश्वस्तांचा समावेश आहे. तसेच, दोन पुजाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती सायबर पोलिसांकडून देण्यात आली.
शनैश्वर देवस्थानचे मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी ४ जून २०२५ रोजी सायबर पोलीस ठाण्यात देवस्थानची व भाविकांची दर्शनासाठी ऑनलाईन बनावट अॅपद्वारे फसवणूक झाल्याबाबत तक्रार अर्ज दिला होता. प्राथमिक चौकशी गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सायबर पोलिसांनी शनिशिंगणापूर गुन्हा दाखल केला.
त्यात देवस्थानची परवानगी न घेता व्हीआयपी दर्शन बुकिंग, ऑनलाईन पूजा, अभिषेक व तेल चढावा बुकिंग करिता भाविकांकडून ऑनलाईन पद्धतीने भाविकांकडून अनियमित दराने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता रक्कम स्वीकारून देवस्थानची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्याअनुषंगाने सायबर पोलीस गुन्ह्याचा तपास करीत आहेत. त्यात आतापर्यंत दोन ते तीन विश्वस्तांची चौकशी करण्यात आली आहे. अॅप बनविण्याचे अधिकार कोणी कोणाला दिले होते, याचाही तपास सुरू आहे.
तसेच, दोन पुजारी व अन्य काही लोक असे सुमारे १२ जणांची सायबर पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. त्या अॅपचे सर्व तांत्रिक पुरावे गोळा केले असून, अन्य काळी पुरावे जमा करण्याचे काम सुरू आहे. भाविकांना ऑनलाईन दर्शनाचा लाभ दिल्यानंतर येणारी रक्कम कोणाच्या खात्यावर गेली आणि किती वेळा गेली, याचा तपास सुरू आहे. त्यात ठोस पुरावे मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सायबर पोलिसांनी सांगितले.
शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानची व भाविकांची बनावट अॅपद्वारे फसवणूक झाली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आतापर्यंत सुमारे बारा जणांची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीअंती ठोस पुरावे मिळाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येईल.
– ज्ञानेश्वर पेंदाम, पोलीस निरीक्षक सायबर