अहिल्यानगर : मागील काही दिवसांपूर्वी शहरात घरफोड्या केल्या जात होत्या मात्र हे चोरटे काही सापडत नव्हते. त्यामुळे नागरिकांसह पोलिस देखील त्यांचा शोध घेत होते. दरम्यान शहरात घरफोड्या करणाऱ्या चौघा सराईत गुन्हेगारांच्या टोळीला तोफखाना पोलिसांच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या कडून तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या घरफोड्या करून चोरलेले सोन्याचे दागिने वितळवून त्याची केलेली एकूण ५ लाख ४५ हजारांची १०० ग्रॅम लगड पोलिसांनी हस्तगत केली आहे.
कैलास चिंतामण मोरे (रा. सोनगीर, जि. धुळे), जयप्रकाश राजाराम यादव (रा. दिनदासपूर, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश), रविंद्र आनंद माळी (रा. सोनगीर, जि. धुळे), सुशील ऊर्फ सुनील ईश्वर सोनार (रा. बालाजीनगर, शिंगावे जि. धुळे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

सावेडी उपनगरातील दसरे नगर येथील गणेश सुधाकर मंचरकर यांच्या घरातून १५ जानेवारी दुपारी कोणीतरी अज्ञात चोरट्याने ५३ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती.
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासत सदरचा गुन्हा हा या चौघा सराईत गुन्हेगारांच्या टोळीने केल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी वरील प्रमाणे गुह्यांची कबुली देऊन गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल काढून दिल्याने तो तपासात जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी, गोरख काळे, दीपक गांगर्डे, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सूरज वाबळे, रमेश शिंदे, सुमित गवळी, सतीष त्रिभुवन, भागवत बांगर यांच्या पथकाने केली आहे.