अहिल्यानगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील सोनाराचे दुकान फोडणाऱ्या चार आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने जालना येथून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ११ किलो २३० ग्रॅम चांदीसह १४ लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक, दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक शिवाजी प्रल्हादराव सासनिक , अमित नंदलाल दागडिया अशी त्यांची नावे आहेत. श्रीरामपूर येथील सराफ निखील विजय नागरे हे दि. १७ जुलै रोजी रात्री सराफ दुकान बंद करून घरी गेले असता चोरांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील ड्रॉवर व कपाटामधील सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा २६ लाख ५९ हजार ७४५ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता हा गुन्हा गोपीसिंग टाक,शिवाजी प्रल्हादराव सासनिक यांनी साथीदारांसह केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सर्व जालना येथे असल्याची माहिती तपास पथकास मिळाली. त्यानुसार २२ जुलै जालना येथे जाऊन जालना पोलिसांच्या मदतीने या आरोपीचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरीच्या गुन्ह्याबाबत चौकशी केली असता १७ जुलै रोजी रात्री कारमध्ये येऊन सराफाचे दुकान फोडल्याची कबुली यांनी दिली.
पोलिस पथकाने त्यांच्याकडून १४ लाख ७ हजारांची मोटारकार व ५ मोबाईल ११ किलो २३० ग्रॅम चांदी, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, अटक असलेला दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक याच्यावर सहनाबाद, जालना, सदर बाजार जालना, तालुका पोलिस ठाणे जालना येथे पूर्वीचे दरोडा तयारी, घरफोडी व चोरीचे १४ गुन्हे दाखल आहेत.