श्रीरामपूर- विविध कारणामुळे आई किंवा वडील अथवा दोन्ही पालक गमावलेल्या लेकरांच्या शिक्षण व संगोपनासाठी असलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेला दोन ते तीन वर्षांपासून पुरेसा निधी नाही. त्यामुळे येत्या क्रांती दिनी ९ ऑगस्टला लाभार्थी लेकरांसह पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयासमोर उपोषण करण्याची तयारी राज्यातील एकल महिलांनी सुरू केली आहे.
साऊ एकल महिला समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात साऊ एकल महिला समितीच्या छत्राखाली एकल महिलांचे संघटन उभे राहिले आहे.

या अंतर्गत एकल महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी तसेच या महिलांसह त्यांच्या एकल पाल्यांना विविध सरकारी योजना, संस्थांच्या योजना, शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी समितीचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहे. एकल पालक असलेल्या व योजनेच्या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या लाभार्थी बालकांना शिक्षण व संगोपनासाठी दरमहा २२५० रूपये लाभ महिला व बालविकास विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने अंतर्गत दिला जात आहे. कोरोनाच्या महासंकटानंतर योजनेच्या लाभार्थीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
पण गेल्या तीन चार वर्षांपासून आयुक्तालय ते मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करूनही योजनेच्या लाभार्थीना दरमहा नियमित लाभ मिळत नाही. त्यामुळे अखेर कंटाळून या लाभार्थी लेकरांसह एकल महिलांसोबत पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालयासमोर साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीदिनी ९ ऑगस्टला धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत आयुक्तांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. त्यावर मात्र त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही.