शेवगाव तालुक्यात चोरट्यांच्या टोळीचा धुमाकूळ, वृद्ध दाम्पत्याला मारहाण तर घरासह दुकान फोडत ४ लाखांचा ऐवज केला लंपास

Published on -

बालमटाकळी- शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे मंगळवारी मध्यरात्री १० ते १२ चोरट्यांनी गावच्या मध्यवस्तीत धुमाकूळ घालत वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली. या वेळी चोरट्यांनी एका घरातून ४ ते ५ तोळ्यांचे सोन्या-चांदीचे दागिने व एक दुकान फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम असा एकूण ४ लाख रुपयांचा ऐवज लुटला.

चोरट्यांनी गावातील हिरालाल धोंडलकर (वय ७५) यांच्या घरात प्रवेश करून त्यांना मारहाण केली तसेच यांच्या पत्नी अरुणाबाई धोंडलकर (वय ७०) यांनादेखील लोखंडी गजाने मारहाण करत त्यांचे दागिने ओरबडल्याने कानाला मोठी जखम झाली. शेजारील पांडुरंग पाथरकर यांच्या दुकानातील गल्ल्यामधील तीन हजार रुपये, पंधरा हजारांचे बेन्टेक्सचे दागिने तसेच वीस हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलिस उपनिरीक्षक रामहरी खेडकर, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले, पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप, गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप, पोहेकॉ. सचिन अंधारे, पोहेकॉ. एकनाथ गरकळ, पोकॉ. देविदास तांदळे आदींनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.

या वेळी गावचे सरपंच डॉ. राम बामदळे, भाजपा नेते तुषारभाऊ वैद्य, शेवगाव बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, बालमटाकळी संस्थेचे माजी चेअरमन हरिश्चंद्र घाडगे, सेवा संस्थेचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष कमूभाई शेख, कासमभाई शेख, कुस्ती संघाचे तालुकाध्यक्ष विक्रम बारवकर, माजी उपसरपंच अशोकराव खिळे आदींनी घटनेचा तपास करण्याची मागणी केली.

बोधेगावसह बालमटाकळी परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बोधेगाव पोलीस दुरक्षेत्रातील लँडलाईन फोन चालू करण्याबरोबर पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. दिवसा चोऱ्या होत असतील तर भविष्यात या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे पोलीस प्रशासनाने बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रात कायमस्वरूपी पोलीस उपनिरीक्षक यांची नेमणूक करून पोलिसांची संख्या वाढवावी अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन देऊन बालमटाकळीत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
– रामनाथ राजपुरे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, शेवगाव

बोधेगाव येथे पोलिस स्टेशन करण्याची मागणी

बालमटाकळी तसेच बोधेगाव परिसरात यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनांचा तपास अद्याप लागलेला नसताना पुन्हा जबरी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात धाडसी चोरी, वाळू, अवैध मुरूम वाहतूक, मटका, जुगार, चक्री, अंमलीपदार्थांची देवाण-घेवण होत असल्याने आणि लगतच मराठवाड्याची सरहद्द असल्याने चोरांचा मोठा वावर या भागात आहे. त्यामुळे बोधेगावात पोलिस स्टेशनची मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!