शिर्डी : सदूरू गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा ही सनातन हिंदू धर्म संस्कृती आणि परंपरेच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.या अध्यात्माच्या अधिष्ठानामागे समाजाने उभ्या केलेल्या सामूहिक शक्तीमध्येच सप्ताहाचे खरे यश दडलेले आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.गुरुवर्य गंगागिरी महाराजांच्या १७८व्या हरीनाम सप्ताहाचे आयोजन वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे करण्यात आले आहे. सप्ताहाचे ध्वजारोहण महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी खा. संदीपान भुमरे, आ. रमेश बोरनारे, सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष महंत हरीशरण गिरी महाराज, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, प्रभाकर अविनाशएक पलाई यांच्यासह नाशिक, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी मंत्री विखे राधाकृष्ण पाटील म्हणाले की, सप्ताहाची परंपरा द्विशताब्दीकडे वाटचाल करत असून जगाच्या पाठीवर अध्यात्मिक क्षेत्रातील या सोहळ्याने अनेक विक्रम नोंदवले आहेत. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात भक्तीरसात न्हालेली समाजशक्ती हेच या सप्ताहाचे यश आहे. ही परंपरा सनातन हिंदू संस्कृती आणि परंपरांना आधार देते.
या वर्षीचा सप्ताह ऐतिहासिक ठरण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे, असे आवाहन करत विखे पाटील यांनी शनिदेवगाव गावाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचे काम सप्ताह सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. शनिदेवगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या कामाला आपण मंजुरी दिली असून त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल.
अशी ग्वाही त्यांनी दिली. हे बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या वेळीच त्यांनी पुलाच्या कामाची पाहणी करून कठड्याच्या कामासाठी तातडीने आदेशही दिले.
या प्रसंगी आ. रमेश बोरनारे यांनी सांगितले की, तीन जिल्ह्यांच्या सीमेवर होणारा सप्ताह वैजापूर तालुक्यात घेण्याचे भाग्य मिळाले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्यामुळे पुलावरील रस्ता व संरक्षण कठड्याचे काम मार्गी लागले आहे, असे त्यांनी नमूद केले. सप्ताहाच्या या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी श्रीरामपूर भाजपचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, दिनेश परदेशी, पंकज ठोंबरे, अविनाश गलांडे, माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे, शिवगिरी आश्रमाचे सदिपान महाराज, मधुसूदन महाराज, रघुनंदगिरी महाराज, विश्वनाथ गिरी महाराज, विजयनंद महाराज, अर्जुनगिरी महाराज योगानंद महाराज, नवनाथ महाराज म्हस्के, सराला बेटचे विश्वस्त मधुकर महाराज आदी उपस्थित होते.