अहिल्यानगर- शासकीय कामाचे पेमेंट न मिळाल्याने सांगली येथील नवोदित युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी नुकतीच आत्महत्या केली. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहिल्यानगर शाखेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध केला. नगर शाखेचे अध्यक्ष संजय गुंदेचा व माजी अध्यक्ष महेश गुंदेचा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता भारत बाविस्कर यांना आंदोलनाच्या इशाऱ्याचे निवेदन दिले.
जिल्हातील कंत्राटदारांचे शासनाकडे १२३१ कोटी रुपयांची बिल प्रलंबित आहेत. गेल्या मार्च महिन्यात यातील केवळ ७ टक्केच बिल शासनाने अदा केली आहेत. अशा तुटपुंज्या पेमेंट मुळे जिल्ह्यातील सर्व ठेकेदार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बँकांचे घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले असून कामगारांचे पगार करणेही आम्हाला मुश्किल झाले आहे.

आमच्या प्रलंबित बिलांसाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने, उपोषणे केली. मात्र, शासनाच्या आडमुठेपणा मुळे यावर सोल्युशन निघालेले नाही. शासनाने वेळीच जर निधीची तरतूद केली नाही तर आमच्यावरही हर्षल पाटील सारखी आत्महत्येची वेळ येऊ शकते. शासनाने त्वरित आमचे प्रलंबित देयके देण्यासाठी तरतूद करावी अन्यथा आम्ही काम बंद ठेऊन तीव्र आंदोल करू, असा इशारा गुंदेचा यांनी दिला आहे.
शासनाच्या या चुकीच्या धारणा विरोधात जिल्ह्यातील सर्व ठेकेदार ११ ऑगस्टला तीव्र आंदोलन करणार आहोत. जर शासनाने याची दखल न घेतल्यास १५ ऑगस्ट नंतर मुंबईत राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.
या बैठकीस अहिल्यानगर सेंटर व्हाईस चेअरमन राहुल शिंदे, सचिन गवारे, कोषाध्यक्ष शिवाजी येवले, रामदास कोल्हापुरे, प्रीतम भंडारी, किरण पागिरे, सचिन भापकर, महेश गायकवाड, पंकज वाघ, श्रीनाथ जिने, योगेश देशपांडे व अमित तोरडमल आदी उपस्थित होते.