मागासवर्गीयांचा निधी न वापरल्याने कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतच केली बरखास्त ; ग्रामविकास मंत्रालयाचा आदेश

Published on -

अहिल्यानगर : मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी शासनाने वेळोवेळी उपलब्ध करून दिलेला निधी खर्च न केल्याने ग्रामविकास व पंचायतराज खात्याने कर्जत तालुक्यातील घुमरी या ग्रामपंचायतची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तसा आदेश काढला आहे.

कर्जत तालुक्यातील घुमरी ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त केल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. घुमरी ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता अनभुले व ग्रामपंचायत सदस्य मंदाबाई अनभुले यांनी कुटुंबातील सदस्यांच्या नावे धनादेश काढून शासकीय रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी त्यांचे पदे जून महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम १४ (ग) नुसार रद्द केले आहे.

दरम्यान घुमरी येथील ऍड.शिवाजीराव अनभुले व ग्रामस्थांनी २७ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायतीने त्यांच्या उत्पन्नातील १५ टक्के निधी मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी खर्च न केल्याची तक्रार शासनाकडे केली होती. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १४५ मधील तरतुदीनुसार विभागीय आयुक्त नाशिक यांचा २७ ऑगस्ट २०२४ चा अहवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी, अहिल्यानगर यांचा २२ मे २०२५ रोजीचा अहवाल विचारात घेऊन या प्रकरणातीत तक्रार व प्रतिवादीचे म्हणणे विचारात घेऊन शासनाने वेळोवेळी ग्रामपंचायतींना उपलब्ध करून दिलेला आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी बंधनकारक असलेला निधी संबंधित ग्रामपंचायत व कार्यकारिणीने खर्च करणे आवश्यक होते.

मात्र घुमरी ग्रामपंचायतीने हा निधी खर्च केला नाही. हे निदर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १४५ मधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये ग्रामपंचायत व कार्यकारिणी विसर्जित करण्यात येत असल्याचा आदेश ग्रामविकास व पंचायतराज मंत्रालयाने काढला आहे. त्यामुळे आता यापुढे या ग्रामपंचायतीचा कारभार गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!