कर्जत- तालुक्यातील येसवडी येथे सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे शेती, जनावरे आणि आरोग्य, यावर दुष्परिणाम होत असल्यामुळे हे खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी शेतकरी व रहिवाशांनी तहसीलदारांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
या परिसरातील बहुतेक नागरिक शेती, दुग्ध व्यवसाय व इतर लघुउद्योगांवर अवलंबून आहेत. मात्र, काही जमीनदारांनी खाजगीरित्या सुरू केलेल्या खडी क्रशर व उत्खननामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ व ध्वनी प्रदूषण होते आहे. यामुळे पिकांचे उत्पादन घटले असून, अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. या भागात माळढोक आरक्षित वनक्षेत्र आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राणी दिसत होते. मात्र, खडी क्रशरच्या आवाजामुळे या भागात वन्यप्राणी दिसेनासे झाले आहेत.

यापूर्वी गावातील नागरिकांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी व पर्यावरण विभागाकडे लेखी तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने आता ग्रामस्थांनी एकत्र येत सामूहिक स्वरूपात आवाज उठवण्याचे ठरवले आहे. या मागणीसाठी सोमवार, दि. ४ ऑगस्ट रोजी सर्व शेतकरी व रहिवासी तहसीलदारांची भेट देऊन आपली मागणी सादर करणार आहेत. या मागणीवर प्रशासनाने तत्काळ कारवाई करून गावातील पर्यावरण व शेती व्यवसायाचे संरक्षण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदनावर भरत पिसे, सुनीता पिसे, बापू पिसे, निर्मला पिसे, अरुण पिसे, सोमनाथ सामसे, सुहास सामसे, सुनील कांबळे, गोरख कांबळे, मंगेश केदारी, संतोष भैलुमे, शरद कुलकर्णी, कैलास कांबळे, सागर केदारी आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आ. रोहित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, वन विभागाचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.