शिर्डी- ग्रो मोअर कंपनीमार्फत अहिल्यानगर जिल्ह्यासह अन्य भागांतील शेकडो गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली असून या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी पुढे येऊन तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांनी फसवणूक प्रकरणाच्या तपासाचा आढावा घेतला. या वेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, प्रांताधिकारी माणिक आहेर तसेच इतर तपास अधिकारी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, गुंतवणूक केलेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. केवळ चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने शिर्डी, परिसर व इतर भागांतील गुंतवणूकदारांनी अंदाजे ३०० ते ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असावी. या प्रकरणी संबंधित सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.
या फसवणूक प्रकरणात शिर्डी संस्थानचे काही कर्मचारी गुंतलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही कर्मचारी थेट कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. त्यामुळे त्यांनी भाविकांची फसवणूक केली का, याचाही सखोल तपास होण्याची गरज आहे.
सध्या सात व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जात असून, त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे वापरून कुठे जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले असतील, तर ते त्वरित थांबविण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, अद्याप पुरेश्या तक्रारी समोर आलेल्या नाहीत. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी राहाता किंवा शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, त्यांच्या माहितीची गोपनीयता राखली जाईल. पोलीस प्रशासनाने यासाठी सहकार्य करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
शेवगाव, पारनेर व सुपा परिसरातही अशाच प्रकारच्या कंपन्यांद्वारे फसवणूक झाल्याची माहिती असून, या प्रकरणांचाही तपास सुरू आहे. शेवगाव येथील आरोपीस न्यायालयाने जामीन नाकारला आहे.