अतिक्रमणात विस्थापित झालेल्या व्यापाऱ्यांना पाच फुटांची जागा द्या, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Published on -

श्रीरामपूर- येथील नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता शहरातील नागरिकांच्या विविध अडचणी सोडविण्या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी विस्थापित व्यापाऱ्यांना नेवासा शहराच्या धर्तीवर पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा द्यावी, अशी विनंती केली.

त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप यांना पुनर्वसन करण्यासाठी बैठक घेऊन विस्थापीत व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवण्याच्या सूचना केल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली अतिक्रमण मोहीम राबवून श्रीरामपूर नगरपरिषदेने शहरातील छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने काढून त्यांना बेरोजगार केले होते. त्यामुळे विस्थापित व्यापाऱ्यांसमोर रोजीरोटी कमावण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

मुलांचे शिक्षण, घरातील वृद्ध आई-वडिलांचे दवाखाने, विविध बँकांकडून तसेच फायनान्स कंपनीकडून घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ झाले होते. त्यावेळी रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष, श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, मर्चेंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये हे विस्थापित व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

व्यापाऱ्यांना पोट भरण्यासाठी पाच फुटाची जागा मिळावी, यासाठी उपोषण, निदर्शने, जवाब दो आंदोलन, श्रीरामपूर बंद, अशी अनेक आंदोलने करून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधले होते.
त्या आंदोलनाची दखल घेऊन ना. राधाकृष्ण विखे पाटलांनी विस्थापित व्यापाऱ्यांचा रोजी रोटीचा प्रश्न सोडवला आहे. त्यामुळे विस्थापित व्यापाऱ्यांचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या आढावा बैठकीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, दीपक पटारे, प्रांताधिकारी किरण सावंत, मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप, माजी नगराध्यक्ष संजय फंड, केतन खोरे, श्रीनिवास बिहाणी, संदीप पवार, गौतम उपाध्ये आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!