अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील कोपरे येथील महिलांनी पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्याकडे गावातील दारुबंदी करावी, अशी मागणी केली होती. पोलिसांनी गावात दारूविक्री करणारे म्हातारदेव दादाबा वाघमोडे यांना पकडून पोलिस ठाण्यात आणले. पुजारी यांनी वाघमोडे यांचे समुपदेशन करून त्यांना दारू व्यवसाय बंद करण्यासाठी साकडे घातले. मी दारूविक्री करणार नाही. मात्र,महिलांनी त्यांचे नवरे सांभाळावेत, ते दुसरीकडे कुठे दारू पिणार नाहीत, याची काळजी घ्यावी असे वाघमोडे म्हणाले.
पोलिसांनी तसेच गावचे सरपंच भाऊसाहेब उघडे यांनी वाघमोडे यांचे अनेक वेळा समुपदेशन केले होते. तरीही वाघमोडे दारूविक्री करीत होते. म्हातारदेव वाघमोडे याच्या ताब्यातून ३५७० रुपयांची देशी दारू जप्त केली. वाघमोडेला पोलिस ठाण्यात आणले. तेथे विलास पुजारी यांनी वाघमोडेला दारू विकू नका, दुसरा कोणताही व्यवसाय करा, मी तुम्हाला मदत करील, असे सांगितले. वाघमोडे यांनी दारुविक्रीचा व्यवसाय करणार नाही, असे सांगितले.

म्हातारदेव वाघमोडे हे माळकरी आहेत. कपाळाला गंध लावतात. दोन मुले आहेत. त्यांच्याकडे दोन जेसीबी मशीन आहेत. मात्र मला खर्चासाठी पैसे नाहीत म्हणून मी दारु विक्री करीत असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले. बाबा तुम्ही पंढरपूरला जाता, मग दारूविकू नका, असे पुजारी यांनी सांगितले आणि त्यांचे मन परिवर्तन
झाले. वाघमोडे यांच्या मुलाला वडिलांना खर्चासाठी पैसे देण्याचे पुजारी यांनी सांगितले.