Bhandardara Dam : भंडारदरा परिसरात पावसाची दमदार हजेरी, भंडारदरा ७७ टक्के तर निळवंडे धरण ७६ टक्के भरले

Updated on -

Bhandardara Dam : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पुनरागमन झाल्याने धरणामधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत धरणाचा साठा ८६१० दलघफूट इतका झाला असून, साठा ७७.९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. विजनिर्मिती केंद्रातून ८४० क्युसेकने प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती भंडारदरा धरण शाखेकडून देण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून भंडारदरा परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतीचे काम ठप्प झाले होते. सलग ३१ दिवस जोरदार पावसामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि भातलागवडी ठप्प झाल्या होत्या.

मात्र, पावसात खंड पडल्यानंतर काही दिवस शेती कामांना गती मिळाली. आता पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने भात लागवडी पुन्हा जोमात सुरू झाल्या आहेत. कळसुबाई शिखर भागातही जोरदार पाऊस सुरू असल्याने कृष्णावंती नदी वाहती झाली असून, त्यामुळे निळवंडे धरणातही पाण्याची आवक वाढली आहे. निळवंडे धरणाचा साठा ७२४० दलघफूट झाला असून ते ८६.९४ टक्के भरले आहे.

यामधून प्रवरा नदीमध्ये १५७० क्युसेसने विसर्ग सुरू आहे. गेल्या २४ तासांमध्ये भंडारदरा परिसरात ७ मिमी पावसाची नोंद झाली. घाटघर आणि रतनवाडी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, रतनवाडी येथे ९१ मिमी आणि घाटघर येथे तब्बल १३२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पांजरे येथे २१ मिमी तर वाकी येथे ११ मिमी पाऊस पडल्याची माहिती धरण शाखेकडून देण्यात आली आहे.

मध्यंतरी झालेल्या विश्रांतीमुळे अनेक ठिकाणी भात लागवड खोळंबली होती. मात्र, आता पुन्हा आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आशा बाळगली असून लागवडीला वेग आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!