अहिल्यानगर : अहिल्यानगरची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा पाणलोटात पावसाचे तांडव सुरुच असून भंडारदरा धरणामधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढविण्यात आल्याची माहिती धरण शाखेकडून दिली.६ मे पासून भंडारदरा पाणलोटात सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नसून शनिवारी व रविवारी भंडारदऱ्याला पावसाने झोडपून काढले. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा ९८०० दलघफूट झाला असून भंडारदरा धरण ८८.७८ % भरले आहे.
अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त पाऊस पडण्याची परंपरा अकोले तालुक्यातील घाटघर या गावाची आहे. त्यामुळे घाटघर या गावाला अहिल्यानगर जिल्ह्याची चेरापुंजी समजले जाते. मात्र यावर्षी चेरापुंजीचे गाव बदलले असून सर्वात जास्त पाऊस रतनवाडी येथे पडत असल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत रतनवाडीला एकूण ३२४७ मि. मी. पाऊस पडला असून रविवारी याठिकाणी १७९ मि. मी. पाऊस कोसळला.

घाटघर येथेही पावसाचे तांडव सुरू असून गत २४ तासांमध्ये घाटघरला १५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू असल्याने मात्र भात पिकांची पुन्हा एकदा वाताहात झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने भंडारदरा धरणातून शनिवारी संध्याकाळी चार हजार क्युसेसने प्रवरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते.
काल पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा धरणातून आणखीविसर्ग वाढविण्यात आला असून सांडव्यामधून ८४९४ क्युसेस व धरणाच्या वीज निर्माण केंद्रातून ८३५ क्युसेस असा एकूण ९३२९ क्युसेकने विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळे निळवंडे धरणामधूनही पाण्याचा विसर्ग वाढला गेला असून १४३६८ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आला आहे.
प्रवरा नदीने लाभक्षेत्रात रौद्ररूप धारण केले आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा ९८०० दलघफूट झाला असून भंडारदरा धरण ८८.७८ % भरले आहे. निळवंडे धरणही ८९.४७% भरले असून पाणीसाठा ७४५१ दलघफुटावर पोहोचला आहे . गत २४ तासांमध्ये भंडारदरा येथे ८२ मि. मी., घाटघर १५५ मि. मी., रतनवाडी १७९ मि. मी., पांजरे ७८ मि.मी. तर वाकी येथे ७८ मि. मी. पावसाची नोंद झाली असून भंडारदराधरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्यास पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून आणखी विसर्ग वाढविला जाऊ शकतो, असे धरण शाखेकडून सांगण्यात आले आहे.