अहिल्यानगर- जेऊर-छत्रपती संभाजीनगर वरून येणारी अवजड वाहने तसेच इतर मार्गावरून येणाऱ्या वाहनांना अहिल्यानगर शहरामध्ये अधिसूचनेप्रमाणे प्रवेश देण्यात यावा अशी मागणी जनसेवा ड्रायव्हर पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोरख कल्हापुरे व प्रदेश उपाध्यक्ष गोरक्षनाथ कराळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, अहिल्यानगर शहरामध्ये आदिसूचनेप्रमाणे वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अवजड वाहनांना प्रवेशाबाबत वेळ ठरवून दिलेली आहे. परंतु याबाबतची माहिती, सूचनाफलक महामार्गावर लावलेले नाहीत. त्यामुळे अनेक वाहन चालकांची दिशाभूल होत आहे. चालक रात्री अपरात्री जनसेवा ड्रायव्हर पार्टीकडे याबाबत तक्रारी करत आहेत.

रात्रीच्या वेळी चौकांमध्ये खाकी वर्दी मध्ये खाजगी लोक राहत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सर्व वाहतूक बायपास मार्गे वळविले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. सदर प्रकार सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झालेला आहे. तरी याबाबत लवकर निर्णय घेऊन आदिसूचनेप्रमाणे नगर शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा बाजारपेठेमध्ये वाहतूक करणारे वाहन तसेच अवजड वाहनांना ठरवून दिलेल्या वेळेमध्ये प्रवेश मिळावा.
अन्यथा जनसेवा ड्रायव्हर पार्टीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी मध्ये, बाजारपेठेमध्ये येणाऱ्या सर्व प्रकारचे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी आठ ते रात्री दहा या कालावधीमध्ये प्रतिबंध करण्यात आलेला आहे. दुपारी एक ते तीन या कालावधीत शहरातील बाजारपेठेमध्ये येणाऱ्या जिवानावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या हलक्या व अवजड वाहनांना प्रवेश करता येईल.
त्याचप्रमाणे दुपारी एक ते तीन वाजता कालावधी वगळून इतर वेळेत अहिल्यानगर शहरांमध्ये कोणत्याही सार्वजनिक जागेवर किंवा रस्त्याच्या आजूबाजूस हलक्या व अवजड मालवाहतूक वाहनांना उभे करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ठरलेल्या अधिसूचनेनुसार अवजड वाहनांना दिलेल्या वेळेमध्ये शहरातुन प्रवेश मिळावा अशी मागणी जनसेवा ड्रायव्हर पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे.
शेंडी बायपास चौकात छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘नो एन्ट्री’ बाबतचे कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. ‘नो एंट्री ‘च्या वेळेबाबत बायपास रोडवर मार्गदर्शन फलक लावल्यास वाहन चालकांची दिशाभूल होणार नाही. याबाबत दखल घेण्याची गरज आहे. – गोरक्षनाथ कराळे (राज्य उपाध्यक्ष जनसेवा ड्रायव्हर पार्टी)