अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘हे’ धरण 40 वर्षात पहिल्यांदाच जूनमध्ये ओव्हरफ्लो! 220 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

Published on -

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यातही अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण यावर्षी जून महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले असून, ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या सुरुवातीलाच धरण भरल्याची अभूतपूर्व घटना घडली आहे. १४ जून २०२५ रोजी सकाळी सात वाजता या धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले, आणि त्यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मे महिन्यात झाला होता जोरदार पाऊस

मे महिन्यातच सीना नदीच्या उगम आणि प्रवाह क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने धरण जलमय झाले. यंदा कर्जत तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस सुमारे ३५० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सूनने जणू धडकाच दिली. वादळी वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ओढे, नाले, छोटे बंधारे सगळीकडे पाणीच पाणी झाले. परिणामी, सीना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आणि अखेर धरण भरून सांडव्यातून नदी पात्रात पाणी सोडावे लागले.

सीना धरणाच्या भरल्याची अधिकृत माहिती तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली असून, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनीदेखील सोशल मीडियावरून ही बातमी जाहीर करत आनंद व्यक्त केला. त्यांनी याला “निसर्गाची कृपा” म्हणत, शेतकऱ्यांसाठी हे आश्वासक संकेत असल्याचे नमूद केले.

सीना धरणाची पाणी क्षमता किती?

धरणाची एकूण क्षमता २.४० टीएमसी आहे आणि १४ जून रोजी दुपारी १२ वाजता धरणातून २२० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला, अशी माहिती धरणाचे सहायक अभियंता संभाजी पवार यांनी दिली. हा पाण्याचा विसर्ग हा केवळ सीना नदीच्या प्रवाहापुरताच मर्यादित नसून तो कर्जत तालुक्यातील २१ गावांसह आष्टी, श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील काही गावांनाही लाभदायक ठरणार आहे. हा पाण्याचा विसर्ग म्हणजे शेतकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहण्याचा क्षण आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

गेल्या चाळीस वर्षात जूनमध्ये भरले धरण

जुन महिन्यात धरण भरल्याचे दृश्य अनेक ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी प्रथमच पाहत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सीना धरणाभोवती पुन्हा एकदा पावसाळी पर्यटनाला उधाण आले आहे. स्थानिक लोक मोठ्या संख्येने धरण पाहण्यासाठी येत असून, त्यांच्यासाठी हे दृश्य एक पर्वणीच ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!