कोपरगाव- जगातील एकमेव मंदिर म्हणून ओळख असलेल्या येथील कोपरगाव बेट मधील गुरु शुक्राचार्य मंदिरात हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री, त्यांची मुलगी डॉ. आस्था मुकेश अग्निहोत्री तसेच हिमाचलचे इतर मंत्र्यांनी नुकतीच भेट देवून गुरू शुक्राचार्य महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले.
यावेळी अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांच्यासह विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना गुरु शुक्राचार्य महाराजांच्या कृपेचा आलेला अनुभव पाहता, मी दरवर्षी दर्शनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मंदिरात १२ महिने, १८ काळ कधीही मुहूर्त न पाहता विवाह करण्यात येते.

त्यांची कन्या डॉ. आस्था मुकेश अग्निहोत्री यांच्या विवाहासाठी त्यांनी महाराजांना अभिषेक करत मनोभावे पूजा केली. येथील मंदिर परिसरात झालेले अमुलाग्र बदल, गुरु शुक्राचार्य महाराजांची सुंदर व प्रसन्न मूर्ती पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत स्तुती केली. आपल्या गुरु शुक्राचार्य मंदिर भेटीचा व महतीचा आवर्जुन उल्लेख हिमाचल प्रदेशमध्ये जनतेला माहित होण्यासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोपरगाव बेट भागात असलेल्या या जगातील एकमेव मंदिरात केलेली पूजा तसेच मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी आभार मानले. महाराजांच्या कृपेने सातत्याने दर्शनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगत शिर्डीकडे प्रयाण केले. याप्रसंगी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह विश्वस्त, शिव भाविक-भक्त उपस्थित होते.