अहिल्यानगर : चारित्र्याच्या संशयावरून ६५ वर्षांच्या पतीने आपल्या ६० वर्षाच्या पत्नीचा कुऱ्हाडीने वार करत निर्घृण खून केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे बुधवारी मध्यरात्री घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दगडू लक्ष्मण खंदारे (वय ६५) हे घारगाव येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवतात.
बुधवारी संध्याकाळी त्यांच्या कुटुंबियांनी नेहमीप्रमाणे एकत्र जेवण केले. जेवून सुरू असताना खंदारे हे आपली पत्नी चंद्रकला खंदारे (वय ६०) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत होते. त्यावेळेस मुलगा भीमा खंदारे यांनी तुम्ही आता झोपण्यासाठी जा, असे त्यांना सांगितले व ते दोघेही पती-पत्नी झोपण्यासाठी शेतातील घराकडे गेले. वडील शांत झाले का नाही हे पाहण्यासाठी भीमा खंदारे हे रात्री शेतातील घरी गेले असता, त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत दिसली व वडील तेथे नव्हते.

मध्यरात्रीच्या सुमारास दगडू खंदारे यांनी चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यात व मानेवर धारदार कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात चंद्रकला खंदारे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती भीमा खंदारे यांनी घारगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी दगडू खंदारे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दगडू खंदारे याला तातडीने ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कठोडी देण्यात आली. याबाबत पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहे.