कर्जत- तालुक्यातील दूरगाव शिवारात वीटभट्टी चालकांकडून शेतजमिनीतील सुपीक मातीचा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा सुरू असून, यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने संतप्त भावना निर्माण होत आहेत. विषेश म्हणजे या वीटभट्टया विना परवाना सुरू आहेत.
या परिसरात अनेक वीटभदूया उभारण्यात आल्या असून, त्यांना लागणाऱ्या मातीची अवैधरित्या उपसा होत आहे. ही माती विना क्रमांकांच्या हायवा, डंपरच्या सहाय्याने दिवसागणिक आणली जात आहे. या माती उपशामुळे जमिनीची धूप होत आहे. तसेच शेतजमिनींचा कस कमी होत असून, पर्यावरणीयदृष्ट्याही गंभीर परिणाम दिसून येत आहेत. या शिवाय अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे (पशुधन) गुरेढोरे, वाहनधारक तसेच स्थानिक रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.

गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी वन विभागाच्या हद्दीतील जमिनीतही माती उपसा करण्यात आला आहे. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महसूल व पर्यावरण विभागाने तत्काळ या माती उपशावर बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
महसूल अधिकाऱ्यांवर माती माफियांची पाळत
माती उपशावर कारवाई करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या हालचालींवर माफिया बारकाईने नजर ठेवून आहेत. अनेकदा पाळत ठेवून कारवाईपूर्वीच माती वाहतूक बंद करून पुरावे नष्ट करण्याचा प्रकार घडतो. काही ठिकाणी अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचे, धमकी देण्याचे प्रकारही होत आहेत. त्यामुळे अधिकारीदेखील दडपणाखाली राहून कारवाईस टाळाटाळ करण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे पोलिस प्रशासन महसूल विभाग आणि आरटीओ यांच्यात समन्वय साधून संयुक्त मोहिमेची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
परप्रांतीय कामगारांमुळे गावात बेकायदेशीर दारू विक्रीला उधाण
गावात उभारलेल्या वीटभट्ट्यांवर बाहेरील राज्यांतून आलेल्या मजुरांची संख्या वाढली आहे. त्यांची कोणतीही पोलिसांकडे अथवा ग्रामपंचायत प्रशासनाकडे नोंद संबंधित वीटभट्टीचालक, मालकांकडून केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटनादेखील वाढू लागल्या आहेत. दुसरीकडे या मजुरांमार्फत गाव परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीचा व्यवसाय बळावला आहे. त्यामुळे स्थानिक तरुणदेखील दारूच्या आहारी जात असून, सामाजिक वातावरण बिघडत आहे. महिलांचे सार्वजनिक ठिकाणी जाणेही मुश्किल झाले असून, गावात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे.
वीटभट्ट्यांमुळे धूर आणि राखेचे संकट; वायू प्रदूषणात मोठी वाढ
परिसरात कार्यरत असलेल्या वीटभट्ट्यांमधून दिवस-रात्र काळा धूर हवेत पसरत आहे. सततच्या धुरामुळे हवेत घनकणांचे प्रमाण वाढून श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा विशेष परिणाम लहान मुले, वृद्ध आणि दम्याचे रुग्ण यांच्यावर होताना दिसत आहे. तसेच वीट भाजताना निर्माण होणारी राख शेतजमिनीत, पाण्यात मिसळून पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. घरांच्या छतांवर, झाडांवर व वाहनेही राखेच्या थराने झाकली जात आहेत. हवेत वेगळीच दुर्गंधी निर्माण होऊन परिसरात राहणेही अवघड झाले आहे.
विना क्रमांकाच्या जेसीबी हायवा-डंपरमधून वाहतूक
मोठ्या प्रमाणावर विना क्रमांकाचे हायवा, डंपर अवैधरित्या माती वाहतूक करताना दिसत आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत माती उपसा आणि वाहतूक बिनधास्त सुरू आहे. अनेकदा भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या अवजड वाहनांमुळे मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. स्थानिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनेदेखील खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांची डागडुजी न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.