नेवासा- फत्तेपूर शिवारात अवैध मुरूम उत्खनन करणारे तीन आरोपी शिंगणापूर पोलीस पथकाने सोमवारी पेट्रोलिंग करीत असताना छापा टाकून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जेसीबी मशीन, डंपर व मुरूम, असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत शनिशिंगणापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी सोमवारी पहाटे पेट्रोलिंग करीत असताना फत्तेपूर शिवारात प्रदीप फुलारी, अनिल कणगरे, रवींद्र महाजन (सर्व रा. भेंडा बुद्रुक, ता. नेवासा) हे अवैध मुरूमाचे उत्खनन करी असताना सापडले. आरोपीकडून २२ लाख रुपयांचा जेसीबी मशीन, १० लाख रुपयांचा डंपर व ९ हजार रुपयांचा मुरुम, असा एकूण ३२ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीवर शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, पो.स.ई. कारखेले, सहाय्यक फौजदार माळवे, पवार, सप्तर्षी, हिवाळे, घाडगे, मोकाटे, लबडे, घोडके, सुपारे, ठुबे, गर्जे, झिने, शेजुळ यांनी ही कारवाई केली.