शिर्डी- विधानसभा मतदारसंघातील शिबलापूर (माळेवाडी) येथील प्रवरा नदीच्या पात्रातून घरकुल योजनेच्या नावाखाली सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय तबाजी मुन्तोंडे हे लवकरच शिबलापूर येथील तलाठी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.
मुन्तोंडे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की, शिबलापूर (माळेवाडी) येथे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलाच्या नावाखाली बनावट कागदपत्रांवर बेकायदेशीर वाळू उपसा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. महसूल विभागाच्या नियमांची पायमल्ली करत वाळू तस्करांकडून सातत्याने वाळू उत्खनन होत आहे. संबंधित अधिकारी कारवाई करत नसल्याचे त्यांनी सांगितले.

या बेकायदेशीर उपशामुळे प्रवरा नदीच्या पात्रात १५ ते २० फूट खोल खड्डे निर्माण झाले असून, आता तस्करांनी शेजारच्या शेतजमिनींमध्ये उत्खनन सुरू केल्याचे मुन्तोंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. विरोध केल्यास संबंधित व्यक्ती “आम्ही स्वतःच सरकार आहोत” असे म्हणत धमकी देतात, जिवे मारण्याची भाषा करतात. नागरिकांनी मागणी केल्यावर वाळू लिलावाच्या पावत्यांची छाननी केली असता, एकाच पावतीवर अनेक ट्रिप्स होत असल्याचे आढळून आले.
या सर्व प्रकारांकडे महसूल प्रशासन डोळेझाक करत असून, अधिकाऱ्यांकडून आर्थिक तडजोड करण्यातच रस घेतला जात आहे, असा आरोप मुन्तोंडे यांनी केला आहे.