शिर्डी- साईबाबांच्या नऊ नाण्यांच्या संदर्भात मुक्ताफळे उधळणाऱ्या गायकवाड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे, तसेच पुरातत्त्व खात्याकडून किंवा इतर सक्षम यंत्रणेकडून या नऊ नाण्यांची शहानिशा केली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.
शिर्डीत साईबाबांच्या नऊ नाण्यांच्या मुद्यावरून वातावरण चांगलेच तापले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांना पत्रकारांनी विचारले की, नऊ नाण्यांबाबत होत असलेल्या वक्तव्यांवर आपली काय भूमिका आहे. यावर उत्तर देताना त्यांनी ठामपणे सांगितले की, गायकवाड यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.

शिर्डी ग्रामस्थांच्या भावना मी पूर्णपणे समजतो आणि त्या भावना १०० टक्के योग्य असल्याचे मला वाटते. नाण्यांच्या माध्यमातून आणि साईबाबांच्या नावाखाली काही लोकांनी वर्षानुवर्षे धंदा केला असून त्या पैशावर मुक्ताफळे उधळली जात आहेत. अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई अनिवार्य आहे.
साईबाबांनी नऊ नाणी दिली, हे मान्य आहे, मात्र आता नाण्यांची संख्या २२ झाली आहे, असा सवाल पत्रकाराने उपस्थित केला असता, मंत्री विखे पाटील म्हणाले की, कोणीही येऊन नाणे दाखवायचे आणि ते बाबांचे आहे असे म्हणायचे, ही पद्धत चुकीची आहे. यामार्फत साईबाबांच्या कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा अवमान केला जात आहे.
या नाण्यांची पडताळणी होण्यासाठी ती नाणे पुरातत्त्व खात्याकडे जमा करावीत किंवा इतर सक्षम यंत्रणेमार्फत त्याची सखोल शहानिशा करावी, असेही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्टपणे नमूद केले.