शिर्डी- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दिनांक ९ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत श्री गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी विविध उपाययोजना व विशेष सेवा-सुविधा राबविण्यात येत आहेत.
उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच १० जुलै रोजी श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. भाविकांना सुरळीत आणि विनाअडथळा दर्शन श्रध्दा
मिळावे यासाठी संस्थानकडून नियोजनबद्ध पावले उचलण्यात आली आहेत. या अनुषंगाने गुरुवार, दिनांक १० जुलै २०२५ रोजी ‘ब्रेक दर्शन’ सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहे.

ब्रेक दर्शन सेवा ही फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे १० जुलै रोजी बंद राहणार आहे. इतर सर्व दिवशी ही सेवा पूर्ववत सुरळीत सुरू राहील. भाविकांनी याची नोंद घ्यावी. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने सर्व भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी नियमित दर्शन व्यवस्थेचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही गैरसमजाला बळी न पडता संस्थेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवर्जून सांगण्यात आले आहे.