अहिल्यानगर- आपल्या समाजात परंपरेनुसार जी जबाबदारी पुरुषाने पार पाडायची असते, तीच जबाबदारी एका सुनेने निष्ठेने पार पाडत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. मूळचे राहुरी तालुक्यातील मुळानगर येथील रहिवासी व सध्या अहिल्यानगर शहरातील गंगा उद्यान येथील पंकज कॉलनीत राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबातील उज्वलाताई कुलकर्णी यांनी त्यांच्या सासू-सासऱ्यांची सेवा स्वतःच्या आई-वडिलांप्रमाणे मनोभावे केली. एवढ्यावरच न थांबता, त्यांच्या निधनानंतर अंत्यविधीही संपूर्ण विधीपूर्वक पार पाडत आपले कर्तव्य पूर्ण केले.
रमाकांत वासुदेव कुलकर्णी हे मुळानगर येथे वास्तव्यास असताना पाटबंधारे विभागात नोकरी करत होते. त्यांना एकुलता एक मुलगा असून त्यांचा विवाह उज्वलाताई कुलकर्णी यांच्याशी झाला होता. कालांतराने उज्वलाताईंचे पती मनोरुग्ण झाले आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. रमाकांत कुलकर्णी यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते सुनेसोबत अहिल्यानगर येथे वास्तव्यास आले. काही काळानंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाले व अलीकडेच रमाकांत कुलकर्णी यांचंही निधन झालं. त्यांच्या मुलाची मानसिक स्थिती लक्षात घेता, त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारीही उज्वलाताईंनी स्वीकारली.

अहिल्यानगर येथील अमरधाममध्ये संपूर्ण धार्मिक विधीपूर्वक त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. हे कार्य करताना त्यांनी आपले कर्तव्य पार पाडल्याचा संतोष व्यक्त केला. उज्वलाताई या सर्वसामान्य कुटुंबातून असूनही त्यांनी समाजासमोर एक मोठा संदेश ठेवला आहे. त्यांनी सांगितले की, जसे आपले जन्मदाते आई-वडील असतात, तसेच सासू-सासरेही आपले आई-वडीलच असतात. त्यांची सेवा हेच आपले खरे कर्तव्य आहे. सासू-सासरे सुनेला आपली मुलगी मानतात, त्याचप्रमाणे सुनेनेही त्यांच्याकडे आपल्या आई-वडिलांप्रमाणेच जिव्हाळ्याने पाहिले पाहिजे.