संगमनेर- गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून पोलिसांनी ९२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास शहरातील एका विद्यालयाच्या परिसरात ही कारवाई केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील ज्ञानमाता हायस्कूल समोर संजय सदाशिव उगलमुगले (रा. तिगाव, ता. संगमनेर) व सागर शिवाजी सोनवणे (रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर) हे हिरा पानमसाला व रॉयल ७१७ तंबाखु (एमएच ४६ ए २९२९) क्रमांकाच्या महिंद्रा झायलो गाडीमध्ये गुटखा विक्री करण्याकरीता वाहतुक करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली.

त्यांनी पोलीस पथकाला या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याची सूचना केली. पोलीस पथकाने रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास ज्ञानमाता विद्यालय जवळ या वाहनाला अडविले. पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता, वाहनामध्ये विविध कंपन्यांचा गुटखा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी या कारवाईमध्ये पाच लाख रुपये किंमत असलेली सिल्वर रंगाची महिंद्रा कंपनीची झायलो मॉडेलची गाडीमध्ये ९२ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याबाबत पोलीस शिपाई रामकृष्ण मुखरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी संजय उगले व सागर सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.