अहिल्यानगर- नगर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यासह राज्यातील हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांना चुना लावणाऱ्या इन्फनेट बिकन कंपनी विरोधात अखेर श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, बेरोजगार यांना फसविणाऱ्या कंपनीचा भांडाफोड करण्यासाठी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी पुढाकार घेतला होता.
बाबासाहेब जगताप यांनी सोशल मीडियाद्वारे गुंतवणूकदारांना संपर्क साधण्याचे आवाहन करत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शेकडो गुंतवणूकदारांनी बाबासाहेब जगताप यांच्याकडे आपली कैफियत मांडली. जगताप हे गुंतवणूकदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने अनेक गुंतवणूकदार समोर येण्यास तयार झाले आहेत.

त्यामुळे सदर कंपनीच्या संचालकांविरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सर्व गुंतवणूकदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन बाबासाहेब जगताप यांनी दिले आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे संबंधित कंपनीच्या १२ संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित कंपनी विरोधात सर्वप्रथम बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी आवाज उठवला होता. कंपनीने शेअर मार्केटच्या नावाखाली तसेच जादा परतावा व विविध आमिष दाखवून गावागावातून गोरगरीब, शेतकरी, महिला, बेरोजगार यांना आपल्या जाळ्यात ओढले होते व संबंधित कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
शेतकऱ्यांबरोबर अनेक व्यावसायिक व प्रतिष्ठित नागरिकांनी देखील संबंधित कंपनीत जादा पैसे मिळण्याच्या मोहापायी आयुष्याची पुंजी गुंतवली होती. परंतु आज त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. गावोगावी एजंट नेमून त्यांनाही ज्यादा कमिशनचे आमिष दाखवण्यात आले होते.
अनेक महिलांनी दाग दागिने मोडून संबंधित कंपनीत गुंतवणूक केली होती.
प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कंपनीच्या कार्यालयांचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक नागरिकांनी संबंधित कंपनीवर विश्वास दाखवत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. परंतु आता सर्वांनाच फसवणूक झाल्याची लक्षात आले आहे. संबंधित कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या सर्वांची एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बाबासाहेब जगताप यांनी दिली.
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या घोटाळ्याप्रकरणी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप यांनी उघडपणे सोशल मीडियावर सर्व गुंतवणूकदारांना जागृत करत याबाबत समोर येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेकडो गुंतवणूकदार समोर येण्यास तयार झाले आहेत. गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे बाबासाहेब जगताप यांनी सांगितले.
सदर कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. त्यामध्ये अनेक गोरगरीब, महिला, शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे सहकार्य करण्याची गरज आहे. तसेच सर्व गुंतवणूकदारांनी कोणाच्याही दहशतीला बळी न पडता कायदेशीर मार्गाचा आधार घेऊन निर्णय घ्यावा. गुंतवणूकदारांना काही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधावा. सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
– बाबासाहेब जगताप (संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा)