लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या निधीच्या कामांना अद्याप मुहूर्त देखील मिळालेला नाही. कोपरगाव शहराच्या दुरवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून पक्षाच्या आमदारांनाच घरचा आहेर दिला आहे. तसेच मित्रपक्ष भाजपाचे शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी देखील टीका केली आहे.
कोपरगाव नगरपरिषदेला मिळालेल्या निधीतील अनेक कामे अद्यापही प्रलंबित आहेत. काही कामांना अद्याप मुहूर्त देखील लागलेला नाही. त्याचा कोपरगाव शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत असून त्याबाबत नागरीकांच्या अनेक तक्रारी असल्याने संबंधित ठेकेदारांना तातडीने सूचना देण्याच्या मागणीचे निवेदन आशुतोष काळे यांचे पदाधिकारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने मुख्याधिकारी सुहास जगताप यांना दिले होते.

त्यावर शहर विकासाचे दावे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांला त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घरचा आहेर दिला आहे, अशी टीका राज्य सरकारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपाचे शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
सत्ता असताना निधी असूनही ठेकेदार काम करत नाहीत, ही बाब अत्यंत संशयास्पद आहे. शहरातील स्वच्छतेसह नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मत मांडणे म्हणजे घरचा आहेर दिला आहे.
कोपरगाव शहराच्या या अवस्थेला प्रशासन जबाबदार नसून त्यावर नियंत्रण ठेवणारे राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत, असे मतही आढाव यांनी व्यक्त केले. तसेच शहरातील विकास कामे ठप्प असल्याचे निवेदन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे भाजपाचे शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी एका पत्रकाद्वारे कौतुक केले आहे.