पैसे डबल होण्याच्या नादापायी शेअर मार्केटच्या कंपन्यांमध्ये फसलेल्या गुंतवणूकदारांचा श्रीगोंद्यात मेळावा

Published on -

श्रीगोंदा- शेअर बाजारात आमिष आर्थिक लाभाचे देऊन लुटणाऱ्या कंपनीच्या विरोधात आंदोलन सुरू केले तेव्हापासून संचालक नवनवीन व्हिडिओ, ऑडिओ प्रसारित करून गुंतवणूकदारांना आशेवर ठेवत आहे. खरच ते रक्कम परत करणारे असतील तर फरार का झालेत. सहा महिन्यांपासून ताराखा देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत.

वेगवेगळ्या नावाच्या कंपन्यांमार्फत शेअर मार्केटच्या नावाखाली महाराष्ट्रातील हजारो लोकांकडून रक्कम गोळा करून नवनाथ अवताडे व त्याच्या इतर संचालकांनी आर्थिक घोटाळा केला आहे. या कंपन्यांमार्फत फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांसाठी राजेंद्र म्हस्के यांनी लढा उभारला असून याच अनुषंगाने गुंतवणूकदारांना आवाहन करून श्रीगोंद्यात मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यात बोलताना म्हस्के यांनी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नवनाथ अवताडे व त्याच्या संचालकांना काही लोक पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये लोकप्रतिनिधी,
वकील, प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी व पोलीस यंत्रणेचा देखील सामावेश असल्याचा आरोप केला. गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढाई लढणार आहे.

यावेळी अॅड. शुभम साके म्हणाले की, गुंतवणूकदारांनी भयभीत न होता समोर येणे गरजेचे आहे. आरोपी तुमची अजूनही दिशाभूल करत आहेत. हि लढाई कायदेशीर लढू व तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देऊ. या मेळाव्यास, अंबादास दरेकर, देवराव वाकडे, कांतिलाल कोथिंबीरे, मुकुंद सोनटक्के, माऊली मोटे, अरूण जगताप यांच्या सह शेकडो गुंतवणूकदार उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!