पाथर्डी तालुक्यातील तीसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले अडीच लाखांचे दागिने, नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

Published on -

पाथर्डी- शाळकरी विद्यार्थ्यांच्या दप्तरांमध्ये आतापर्यंत खाऊ, जेवणाचा डबा, घरातील साहित्य, खेळणी, प्रसंगी प्राणघातक शस्त्र सुद्धा आढळून आली आहेत. मात्र तालुक्यातील निंबोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे अडीचशे ग्रॅम सोन्याचे दागिने आढळून आले. पालकांना बोलावून खात्री करून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हाती दागिने सुपूर्त करण्यात आले.

कल्याण विशाखापट्टण राष्ट्रीय महामार्गावर निंबोडी गावच्या हद्दीत स्वामी विवेकानंद विद्यालय आहे. शेकडो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. परिसरातील सुमारे २५ गावांमधील विद्यार्थी येथे येत असल्याने त्यांच्यासाठी शालेय बसची सुविधा आहे.

पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी परिसरातील एका विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये दैनंदिन दप्तर तपासणी करताना वर्गशिक्षिका मयुरी गारुडकर यांना तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात चक्क दागिने आढळून आले. संबंधित शिक्षिकेने मुख्याध्यापिका मनीषा पालवे व संस्थाचालक अंकुश पालवे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला.

दागिने कुठून आणले की संबंधित विद्यार्थ्यांनी घेतले याची खातरजमा करत असताना शिक्षकांना असे आढळून आले की दप्तरामध्ये दागिने असल्याची विद्यार्थ्याला सुद्धा कल्पना नव्हती. सध्या ग्रामीण भागामध्ये दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवसा व रात्री भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागामध्ये चहा साखरेचा डबा, पिठाचे अथवा किराणा सामानाचे डबे, कपड्याचे कपाट, पत्र्याचे कपाट, पाण्याच्या रांजणामध्ये कॅरीबॅगमध्ये घालून तळाला दागिने अशा पद्धतीने लपवून ठेवले जातात.

पूर्वीच्या काळी देखील जमिनीत दागिने पुरून ठेवण्याची ग्रामीण भागात पद्धत होती. आता घरात
सर्वत्र चकचकीत फरशा झाल्याने मातीचा कोठेही संबंध राहिला नाही. जुन्या पिढीतील महिलांना दागिने लपवून ठेवण्याची वेगळी सोय नसल्याने कुटुंबातील कोणीतरी दागिने लपविण्यासाठी मुलाच्या दप्तरात सुरक्षित ठेवण्याची शक्कल लढविली असावी अशा शक्यतेनेच दागिने ठेवण्यात आले असावेत, असे सर्वांचे मत बनले.

सकाळी मुलगा शाळेत जाण्यापूर्वी पुन्हा दागिने काढून घेऊ, स्कूल बस वेळेवर आली. घराच्या बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. मुलगा दप्तर खांद्यावर अडकून गाडीत बसून शाळेत निघून गेला.

कामाच्या घाईमध्ये दप्तरात लपवून ठेवलेले दागिने काढण्याची घरातील व्यक्तीला आठवण राहिली नाही. मुलांच्या दप्तरांमध्ये प्राणघातक शस्त्रास्त्रे व इतर साहित्य आढळून येण्याचे प्रकार राज्यात आढळून आल्याने संस्थाचालकांच्या सूचनेनुसार सर्व शिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांचे दप्तर तपासून पाहणी करतात. अशा पाहणीमध्ये शिक्षिकेला दागिने सापडले. दागिने पालकांच्या हातात जसेच्या तसे मिळाले या चर्चेबरोबरच शिक्षिकेच्या प्रामाणिकपणाचेही संपूर्ण पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!