अहिल्यानगर जिल्ह्यातीत खरिप पिके पावसाअभावी धोक्यात

Published on -

जेऊर- अहिल्यानगर तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. अनेक भागात पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे. पावसाच्या ताणामुळे उत्पन्नात मोठी घट होणार आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार असून, तत्काळ नुकसान होत असलेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी निंबळक सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी केली आहे.

अहिल्यानगर तालुक्यात मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला होता तसेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत. तालुक्यात सरासरी ९१ टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.

बाजरी, मूग, सोयाबीन, उडीद, तूर तसेच विविध पिकांच्या पेरण्या करण्यात आलेल्या आहेत. मृग व आर्द्रा नक्षत्रावर पाऊस होईल, याबाबत शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा होती; परंतु पावसाने निराशाच केली. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश भागात पिके कोमजण्यास सुरुवात झाली आहे.

काही भागात पिके हिरवी दिसत असली तरी पाण्याचा ताण पडल्याने पिकांना बहार कमी प्रमाणात येणार आहे. परिणामी उत्पन्नात मोठी घट होणार आहे. पावसाअभावी पिके कोमजण्यास सुरुवात झालेली आहे. खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही. तालुक्यात सुमारे ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या करण्यात आलेल्या आहेत.

शेतीची मशागत, बियाणे, औषधांची फवारणी यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला आहे. परंतु पावसाने निराशा केल्याने शेतकरी वर्गामध्ये मोठी चिंता पसरली आहे.
शेतकरी अडचणीत सापडलेला असताना राज्याचे कृषिमंत्री पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो; ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा निषेध करतो.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सर्व पिकांची पाहणी करून पंचनामे करत आर्थिक मदत देण्याची मागणी निंबळक गावच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी केली आहे.

तालुक्यातील सर्व भागातील पिकांची पाहणी करण्यात यावी. ज्या पिकांना पावसाअभावी फटका बसला आहे, अशा पिकांचे पंचनामे करण्यात यावेत. खरीप पिके वाया गेलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी. अन्यथा खा. नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निर्णय घेण्यात येईल. -सौ प्रियंका लामखडे (सरपंच, निंबळक).

अहिल्यानगर तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे. येथील शेतीला शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याने शेती व्यवसाय पूर्णतः पावसावर अवलंबून असतो. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. चालू वर्षी खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!