कोपरगाव- येथील नगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. आधी कामे झाली, मग निविदा काढल्या. झालेल्या कामासाठी निविदा निघणे ही एक गंभीर बाब आहे. विशेषतः जेव्हा ते काम काही दिवसांपूर्वी पूर्ण झाले असेल. या गैरप्रकाराची शहर परिसरात चर्चा सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विविध प्रभागातील भुयारी गटारींची २० लाखाची कामे झालेली आहे. आता कामानंतर त्याच कामांच्या निविदा काढण्यात आलेल्या आहे. ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहे. ज्या ठेकेदारांनी ही कामे केलेली आहे, निविदांमध्ये ही कामे त्यांच्याच नावावर टाकण्यात येतील, अशी शक्यता आहे. नव्याने निविदा काढणे हा केवळ बनाव असल्याचे बोलले जात आहे.

निविदा प्रकारातील पारदर्शकता आणि गोपनीयतेचा हा भंग आहे. त्याचा अर्थ काम पूर्ण असूनही केवळ गैरप्रकाराच्या उद्देशाने, त्याच कामासाठी पुन्हा निविदा काढल्या जातात. नगरपरिषद हद्दीतील वाघ प्लॉट ते सानिका आईस्क्रीमपर्यंत भुयारी गटार बांधकाम करण्याचे काम मागच्या काळात अर्धवट आणि अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. त्याचीच पुन्हा एकदा निविदा काढल्याची जोरदार चर्चा चालू आहे.
अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने शहरांमधील निकृष्ट बांधकामांना अभय मिळते, ज्यामुळे नागरिकांनी भरलेल्या करांचा अपव्यय होतो. रस्त्यावरील विकास कामांची गुणवत्ता आणि दर्जा तपासण्यासाठी लोक रस्त्यावर आडवे पडतील.
कामाचा हिशेब विचारण्यासाठी सामाजिक संस्था किंवा जागरूक नागरिकांनी या गैरप्रकाराबाबत आवाज उठवला पाहिजे, जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव येईल आणि चौकशी होईल, अशी अपेक्षा नागरीकांतुन व्यक्त होत आहे.
तीनपेक्षा कमी निविदा प्राप्त झाल्यास किंवा निविदा प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्यास, मूळ निविदेत बदल न करता पुन्हा निविदा मागवल्या जाऊ शकतात. मात्र, या संदर्भातही संशयास्पद बाबी तपासल्या पाहिजेत. परंतु आधी कामे करून नंतर निविदा काढणे हा प्रकार चुकीचा आहे.