प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र मांदळी येेथे आषाढी एकादिशीनिमित्त लाखो भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिरात २०० रक्तदात्यांनी केले रक्तदान

Published on -

मिरजगाव- कर्जत तालुक्यातील श्रीक्षेत्र मांदळी या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्री आषाढी एकादशीनिमित्त पहाटे पासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या वेळी लाखो भाविकांनी लालगीर स्वामींची संजीवन समाधी व ब्रम्हरुपविदेही आत्मारामगिरी महाराजांचे दर्शन घेतले.

मांदळी येथील संत लालगिरी स्वामी महाराज मठ, आत्मारामगिरी बाबा महाराज यांच्या दर्शनासाठी मंदिरात दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रम आणि हरिनामाच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला. प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मांदळीकडे नगर, करमाळा, आष्टी, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत आदी भागातून पायी दिंड्यांचा ओघ वाहत होता.

त्याचप्रमाणे पंढरपूरहून परतीचा प्रवास करणारे वारकरीदेखील दर्शनासाठी थांबत होते. येथील मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. या वेळी आयोजित रक्तदान शिबिरात २०० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

दर्शनानंतर प्रत्येक भाविक भक्तांना देवस्थानच्या वतीने चहा व खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी वाहनतळ तसेच महिलांसाठी व पुरूषांसाठी दर्शनासाठी स्वंतत्र रांगा लावण्यात आल्या होत्या.

आलेल्या भाविकांच्या काही किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी प्रसादाचे मोठ मोठे स्टॉल तसेच स्टेशनरी दुकाने, फळविक्रेत्यांनी आपली दुकाने मांडली होती. मुख्य प्रवेशद्वारापासून देवस्थानकडे जाणारे सर्व रस्ते भाविकांच्या गवीने फुलून गेले होते.

भाविकांना सुलभरित्या दर्शन घडवून आणण्यासाठी तसेच महाप्रसाद वाटपाकरिता येथील ट्रस्टचे अध्यक्ष धनेश गांगर्डे, सचिव राजेंद्र गांगर्डे, विश्वस्त केशव गांगर्डे, रमेश शिंदे, शिवाजी गांगर्डे तसेच सर्व विश्वस्त मंडळ व निमगाव गांगर्डा येथील तरुण मंडळाचे पदाधिकारी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, मांदळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाविक व टायगर ग्रुपचे मुले, पोलिस मित्र, स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मिरजगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय झंजाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!