गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या साई व शनी भक्तांची मोठी संख्या, गुजरात-महाराष्ट्र रेल्वे गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी

Published on -

सुपा- गुजरात श्रमजीवी कामगार युनियनचे प्रमुख कामगार नेते कल्याणशेठ शहाणे यांनी गुजरात ते महाराष्ट्र प्रवासादरम्यान रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अहमदाबाद ते वडोदरा, अंकलेश्वर, सुरत, महाराष्ट्रालील नंदुरबार मार्गे अमळनेर, जळगाव, मनमाड ते अहमदनगर ते कर्नाटकातील यशवंतपूर पर्यंत आठवडयातून यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही फक्त एकच गाडी आहे. हा मार्ग नंदुरबार, अमळनेर, जळगाव, मनमाड, अहमदनगरला जातो. या मार्गावर आठवड्यातून किमान चार वेळा ट्रेन असणे गरजेचे आहे.

गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा, अंकलेश्वर, सुरत ही जागतिक बाजारपेठ असलेली व औद्योगिक शहरे आहेत. या ठिकाणांवरून दररोज हजारो व्यापारी नंदुरबार, मनमाड, अहमदनगर, दौंड येथे प्रवास करतात. त्यांना ये-जा करण्यासाठी फक्त एकच गाडी असल्याने व्यापाऱ्यांना प्रवासादरम्यान अडचणी येत आहेत, तसेच गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या साई व शनी भक्तांची संख्या मोठी आहे.

साई व शनीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक शिर्डी व शनी शिंगणापूर येथे येत असल्याने या भक्तांसाठी आठवडयातूनकिमान चार गाड्या असणे गरजेचे आहे. अहमदाबाद, बडोदा, अंकलेश्वर व सुरत ही गुजरातमधील कापड आणि हिरे उद्योगांची जागतिक व्यापारी केंद्रे आहेत.

महाराष्ट्रातून लाखों कामगार नोकरीसाठी या शहरांमध्ये वास्तव्यास आहेत, त्यांना त्यांच्या गावाकडे ये – जा करण्यास खूप अडचणी येतात तसेच महाराष्ट्रातून हजारो लोक, भाविक व पर्यटक स्टॅच्यू ऑफ युनिटी, सोमनाथ मंदिर, साबरमती, नर्मदा परिक्रमा, वेरावळ यासारख्या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी गुजरातमध्ये येतात व त्यांनादेखील प्रवासादरम्यान अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

गुजरात राज्यातून व्यापारी, भाविक व कामगार यांना महाराष्ट्रात ये- जा करण्यासाठी रेल्वे सेवा वाढविण्याची मागणी कल्याण शहाणे यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!