एक कोटीची दारू जप्त करत ९११ गुन्हे तर, १०३३ जणांना अटक राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सहा महिन्यांचा लेखाजोखा

Published on -

अहिल्यानगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जिल्ह्यातील विना परवाना दारू विक्री करणारे हॉटेल, ढाब्यांवर आपले लक्ष केंद्रित केले असून,
गेल्या सहा महिन्यात जिल्ह्यात अशी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत सुमारे एक कोटी १६ लाख ७५ हजार ८६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर ९११ गुन्हे दाखल करून १०३३ आरोपींना अटक केली.

जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम जोमात आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात सर्रास हॉटेल, ढाब्यांवर अवैध दारू विक्री व गावठी दारूचे अड्डे असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या.

त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनुने यांनी सर्वच निरीक्षकांना अवैध दारू विक्री, हातभट्टी, हॉटेल व ढाबा चालकांवर थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात कारवाई सुरू आहे. जानेवारी २०२५ ते जुलै २०२५ पर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध भरारी पथकाने जिल्ह्यात सुमारे ९११ ठिकाणी कारवाई केली.

त्यात गावठी दारू अड्डा, अवैध मद्य निर्मिती, भेसळयुक्त ताडी, विना परवाना दारू विक्री करणारे हॉटेल व ढाबे तसेच परराज्यातून होणारी मद्य वाहतूक, स्पिरीटची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे एक हजार ३३ जणांना अटक करण्यात आली तर, सुमारे २७ वाहने जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण एक कोटी १६ लाख ८६१मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, केवळ विना परवाना दारू विक्री करणाऱ्या सुमारे २३० हॉटेल, ढाब्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे २६५ जणांना अटक करण्यात आली. त्याच्याकडून ९ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दारू बंदी कायद्यानुसार विना परवाना सतत दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. विना परवाना दारू विक्रीचे सतत गुन्हे दाखल झाल्यास संबंधितांकडून बंधपत्र घेण्यासंदर्भात उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला जातो. अवैध दारू विक्री करणारा व जामीनदार असे दोघांकडून बंधपत्र घेण्यात येते. बंधपत्राच्या माध्यमातून आतापर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाला ६१ लाखांचा महसूल जमा झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!