श्रीरामपूर- पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी टिळकनगर इंडस्ट्रीज संदर्भात केलेल्या विधानावरून परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. त्यांनी दिलेली माहिती चुकीची व दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत दत्तनगर, टिळकनगर, एकलहरे आणि रांजणखोल येथील ग्रामस्थांनी टिळकनगर चौफुलीवर अनोखे आंदोलन केले.
‘जोडे मारो’ आंदोलनाद्वारे निषेध
प्रतिकात्मक पद्धतीने आमदार ओगले यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून आंदोलकांनी त्यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला. या आंदोलनात भीमराज बागुल, सुभाष त्रिभुवन, संजय बोरगे, सचिन ब्राह्मणे, राजू त्रिभुवन, अमर ढोकचौळे, प्रदीप गायकवाड, विशाल सुरडकर, संदीप बागुल, डॉ. सुधीर ब्राह्मणे, राजू खाजेकर, आनंद चावरे, प्रदीप कदम, शरद भणगे, रमेश ढोकचौळे यांचा सहभाग होता.

पोलिसांना निवेदन
आंदोलनानंतर ग्रामस्थांनी पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्याकडे निवेदन सादर करत आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे मागणी केली की, आ. ओगले यांनी आपल्या विधानसभेतील आरोप मागे घ्यावेत आणि टिळकनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर येऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा या विरोधात आणखी उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
ओगले यांचे स्पष्टीकरण
या सर्व प्रकारानंतर आमदार हेमंत ओगले यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, टिळकनगर इंडस्ट्रीज ही त्यांच्या दृष्टीने ‘कामधेनू’ आहे. त्यांनी फक्त काही शेतकऱ्यांच्या तक्रारींवरून दूषित पाण्याच्या समस्येचा मुद्दा सभागृहात मांडला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा विषय स्थानिक हितासाठीच होता, मात्र त्यांच्या विधानाचा विपर्यास करून त्याचा विपरित अर्थ लावला गेला.
सामंजस्याने वाद सोडवू
आ. ओगले यांनी हेही नमूद केले की, टिळकनगर, दत्तनगर आणि परिसरातील ग्रामस्थ हे त्यांच्याच कुटुंबाचा भाग आहेत. तेथील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक संस्था यांच्या सहकार्यानेच विकास शक्य आहे. त्यामुळे संवादातून गैरसमज दूर करणे आवश्यक असून, कोणत्याही प्रकारचा वाद सामंजस्याने सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले.