राहुरी तालुक्यातील तीन ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा, तिघांना घेतले ताब्यात

राहुरी- अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक ९ जुलै रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरी, कुक्कडवेढे रस्ता आणि उंबरे शिवारातील तीन ठिकाणी छापेमारी करत १७ हजार रुपयांच्या आसपासची देशी-विदेशी दारू जप्त केली. या कारवाईत तिघांना ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वांबोरी शिवारातील हॉटेल शिवमच्या आडोशाला गणेश किसन भिटे नामक इसम देशी व विदेशी दारू विक्री करताना सापडला. त्याच्याकडून ५ हजार २८० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.

यानंतर वांबोरी ते कुक्कडवेढे रस्त्यावरील हॉटेल अष्टविनायकच्या आडोशाला अशोक तडलोक माळी (रा. देवळाली प्रवरा) हा इसम दारू विक्री करताना सापडला. त्याच्याकडून ४ हजार ८८५ रुपये किमतीची देशी-विदेशी दारू
जप्त करण्यात आली.

तिसऱ्या ठिकाणी उंबरे शिवारात छापा टाकताना हॉटेल साक्षीच्या आडोशाला विजय अदिनाथ मिसाळ (रा. मुलमाथा, ता. राहुरी) हा इसम दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ६ हजार ८२० रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली.

या सर्व कारवायांदरम्यान पंचासमक्ष पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी रणजीत पोपट जाधव आणि रमिजराजा रफिक आतार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश किसन भिटे, अशोक तडलोक माळी आणि विजय अदिनाथ मिसाळ यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पथक करत आहे.